मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमधील आचारसंहितांचे उल्लंघन असो वा षटकांची गती राखण्याचा नियम मोडणे असो यासाठी खेळाडूंना मोठा दंड ठोठावला जातो. हा दंड लाखांत किंवा कोटींमध्ये असतो. मग एवढा मोठा दंड खेळाडू भरतात का, असा प्रश्न सर्वांना पडणे स्वाभाविक आहे. खरे तर तसे होत नाही. दंड खेळाडूंना ठोठावला तरीही तो खेळाडूंकडून वसूल केला जात नाही.
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मैदानावरील वादामुळे सगळे विषय ऐरणीवर आले आहेत. कारण दोघांनाही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शंभर-शंभर टक्के दंड ठोठावण्यात आले आहेत. अर्थात त्यांचे संघ जेवढे सामने खेळतील, त्याच्या प्रमाणात या दंडाचे बील त्यांच्या संघाकडे पाठविले जाईल. विराट आणि गंभीरसह नवीन उल-हक यालाही दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र हे तिघेही स्वतःच्या कमाईतून दंड भरणार नाहीत. तर त्यांचे संघ हा दंड भरतील.
अर्थात विराटच्या दंडाची रक्कम आरसीबी आणि गंभीर व नवीनच्या दंडाची रक्कम लखनौ संघ भरेल. उदाहरणार्थ, विराट कोहलीला एका हंगामासाठी १५ कोटी रुपये मानधन मिळतं. अर्थात प्लेअॉफ वगळता १४ सामन्यांसाठी प्रत्येक सामन्याची त्याची फी १ कोटी ७ लाख एवढी आहे. आरसीबी फायनलमध्ये पोहोचले तर त्याच्या एकूण सामन्यांंमधून फी ठरविली जाते.
खेळाडू संघासाठी लढतो
प्रत्येक खेळाडू हा मैदानावर संघासाठी लढतो. मैदानावर तो जे काही करतो ते संघ जिंकावा म्हणून करतो किंवा संघाचा प्रतिनिधी म्हणून करतो. त्यामुळे त्याच्या कुठल्याही कृतीला दंड ठोठावण्यात आला तर तो भरण्याची जबाबदारी फ्रेंचायजी घेत असते. अर्थात फ्रेंचायजीने तो दंड भरलाच पाहिजे असे नाही. पण आपल्या खेळाडूंवर आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून फ्रेंचायजी हा निर्णय घेत असते.
IPL Players Fine Lakh Crore Payment Rule COC