मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढील पाच हंगामांसाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीसाठी थेट प्रसारणाचे हक्क विकण्यात आले आहेत. भारतीय खंडातील टीव्ही आणि डिजिटल मीडियासाठी हे अधिकार असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-लिलावाद्वारे, 410 सामन्यांचे प्रसारण हक्क एकूण 44,075 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावेळ पेक्षा (2017-22) ही रक्कम तब्बल अडीच पट अधिक आहे. टीव्हीचे हक्क 23,575 रुपये प्रति सामन्यासाठी 57.5 कोटी रुपये आणि डिजिटल हक्क रुपये 20,500 कोटी रुपये प्रति सामना 50 कोटी रुपये या दराने विकले गेले आहेत.
दोन वेगवेगळ्या मीडिया कंपन्यांनी टीव्ही आणि डिजिटलचे मीडिया हक्क विकत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या कंपन्यांची नावे अद्याप अधिकृतपणे समजलेली नाहीत. मीडिया अधिकार चार पॅकेजेसमध्ये विभागले आहेत – A, B, C आणि D. पॅकेज A मध्ये भारतीय उपखंडासाठी टीव्ही अधिकार समाविष्ट आहेत, पॅकेज B मध्ये त्याच प्रदेशासाठी डिजिटल अधिकार समाविष्ट आहेत. पॅकेज C ला प्रत्येक हंगामासाठी निवडक 18 सामने डिजिटली प्रसारित करण्याचे अधिकार मिळतील, ज्यात हंगामाचा पहिला सामना, आठवड्याच्या शेवटी प्रत्येक डबल-हेडरमधील संध्याकाळचा सामना आणि चार प्लेऑफ सामने समाविष्ट आहेत. पॅकेज डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेर टीव्ही आणि डिजिटल प्रसारण अधिकार समाविष्ट आहेत.
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सोनीने 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएलचे टीव्ही हक्क विकत घेतले आहेत, तर जिओने आयपीएलच्या डिजिटल अधिकारांसाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. तथापि, आतापर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI आणि IPL कडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.