ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) – सध्या देशात इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचा ज्वर चढलेला आहे. मध्य प्रदेशच्या १९ वर्षांखालील संघाचे माजी कर्णधार विक्रांत भदौरिया यांना ऑनलाइन पिझ्झा मागविणे चांगलेच महागात पडले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे विक्रांत यांनी तीन दिवसांपूर्वी डोमिनोवर पिझ्झा ऑनलाइन मागविला होता. परंतु ऑर्डर केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून जवळपास ५० हजार रुपये परस्पर गायब झाले.
ऑर्डर डिलिव्हरीपूर्वी ३०० रुपये भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली. या लिंकवर क्लिक करताच खात्यातून ४९ हजार ९०० रुपये काढले गेले. विक्रांत यांनी डोमिनोजचा नंबर इंटरनेटवरून शोधून काढला आणि तिथेच त्याची फसवणूक झाली. गुन्हे विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगा रमेश भदौरियाच्या खांद्याच्या दुखापतीमुळे विक्रांत घरीच आराम करत होते. कोरोना संचारबंदी लागू होण्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच १४ एप्रिलला त्यांना पिझ्झा खाण्याची इच्छा झाली. रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये बसून खाण्यावर निर्बंध असल्यामुळे त्यांनी पिझ्झा ऑनलाइन मागवण्याचा विचार केला. त्यांनी इंटरनेटवर डोमिनोजचा नंबर शोधला. संबंधित नंबरवर डायल केल्यावर समोरून प्रतिसादही आला. तसेच ऑनलाइन पैसे भरल्यानंतर ऑर्डर वेळेत पोहण्याबाबतही सांगण्यात आले.
५० हजारांचा लागला चुना
विक्रांत भदौरिया यांनी गुन्हे विभागाच्या पोलिसांना सांगितले की, ज्या नंबरवर ऑर्डर मागविली, त्याच नंबरवरून एक लिंक आली. त्या लिंकवर क्लिक करताच खात्यातून ४९ हजार ९०० रुपये गायब झाले. फसवणूक करणारा चालाख आहे. कारण ५० हजार रुपये अथवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे भामट्यांनी शंभर रुपये कमी काढले.