नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमध्ये रंगारंग कार्यक्रम बघायला मिळतात. सामना जिंकल्यानंतर फ्रेंचायजीकडून पार्टी दिली जाते. बऱ्याच प्रमाणात खाण्या-पिण्याची सूट असते. ओळखीच्या लोकांच्या भेटी घेता येतात. पण त्याचे दुष्परिणामही बघायला मिळतात. त्यामुळे एका घटनेनंतर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या खेळाडूंसाठी आचारसंहिता जारी केली आहे.
यावर्षीच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत सातपैकी सलग पाच सामने हरणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने केवळ दोन सामन्यांमधील विजय नावावर केला आहे. त्यामुळे तसेही संघात काही फारसे चांगले वातावरण नाही. अश्यात बऱ्याच गोष्टी नकारात्मक घडत असतात. अश्यात दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूने महिलेशी गैरवर्तन केले आणि चांगलेच वादळ उठले.
जवळपास सर्व आयपीएल संघांपर्यंत याची माहिती पोहोचली. पण संघ व्यवस्थापनाने खेळाडूवर कारवाई करून बदनामी ओढवण्यासाठी खेळाडूंसाठी आचारसंहिताच तयार केली आहे. फ्रँचाईजीने आयोजित केलेल्या एका पार्टीत दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने महिलेसोबत गैरवर्तन केल्यानंतर व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले आहे. या आचारसंहिते अंतर्गत खेळाडूंच्या खोलीत कोण येतो, कोण जातो यावरही लक्ष असणार आहे. कुणाला भेटायचे असेल तर हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॉफी शॉपमध्येच भेटावे लागणार आहे.
रात्री दहानंतर परवानगी नाही
याशिवाय रात्री दहानंतर खेळाडूंच्या खोलीत कोणत्याही बाहेरच्या परीचिताला येण्याची परवानगी नसेल. आणि एखाद्या खेळाडूला कुणाला भेटण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी हॉटेलच्या बाहेर जायचे असेल तर व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील इत्तंभूत माहिती देणे आता बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे आचारसंहितेचा भंग केल्यास खेळाडूला दंड होऊ शकतो किंवा फ्रेंचायजीसोबत केलेला करारही रद्द केला जाऊ शकतो, अशी तंबीच देण्यात आली आहे.
फोटो आयडी बंधनकारक
खेळाडूंना सामना नसलेल्या दिवशी हॉटेलच्या खोलीत कुणाला भेटायला बोलवायचे असेल तर संबंधित व्यक्तीचे फोटो आयडी फ्रेंचायजीच्या अधिकाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक असणार आहे. फ्रेंचायजीच्या कार्यक्रमांना उशीर होणार असेल किंवा येणे शक्य नसेल तर आधीच कळविणे बंधनकारक असणार आहे.
IPL Delhi Capitals Team Women Sexual Abuse