इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सट्टेबाजांची हायटेक पद्धतीने फसवणूक करणाऱ्या बुकीला मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. सोफ्टवेअरच्या मदतीने तो सट्टेबाजांना दोन चेंडू मागे सुरू असलेला सामना दाखवत. त्याच्या जाळ्यात येऊन सट्टेबाज सट्टा लावत आणि एका झटक्यात लाखो रुपये गमावत, अशी आरोपी बुकीची मोडस ऑपरेंडी होती.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त सहाय्यक पोलिस उपायुक्त गुरुप्रसाद पाराशर यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की अटक केलेल्या आरोपीचे नाव नारायण प्रल्हाददास निमा (श्रीकृष्णनगर) असे आहे. आरोपी नारायणचे दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथील सट्टेबाजांशी संबंध आहे. तसेच त्याने १० टक्के कमिशनवर सट्टेबाजांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा मास्टर आयडी मिळवला होता.
क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांना याच सॉफ्टवेअरचा एजंट आयडी वाटून दिला होता. या आयडीवर सट्टा लावण्यासह ऑनलाइन क्रिकेटचा सामनाही दाखवला जात होता. टी-ट्वेंटी सामन्यात प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो याचाच गैरफायदा घेत आरोपी नारायण हा दोन चेंडू मागचा सामना दाखवत होता. याच आधारावरून तो भावात चढ-उतार होत असल्याचे दर्शवत होता. सट्टा लावणारे एजंट याच जाळ्यात फसत होते आणि आरोपी लाखोंचे रुपये कमवत होता.
आरोपी नारायणकडून लॅपटॉप, ६ मोबाईल आणि कोट्यवधीचा हिशेब आढळला आहे. त्याचे कॉल डिटेल्स तपासून आयडी मिळवलेल्या सर्व सट्टेबाजांची माहिती शोधून काढली जात आहे. नारायणला मास्टर आयडीवर १० टक्के आणि एजंट आयडीवर ५ टक्के कमिशन मिळत होते.