चेन्नई – चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)चा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तो आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार असून, व्हिसल पोडू सेना म्हणजेच सीएसकेचे फॅन्स त्याला चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर अखेरचा सामना खेळताना पाहू शकणार आहेत. आयपीएलच्या आगामी लिलावात संघामध्ये मोठा बदल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी हंगाम खेळणार असल्याचे संकेत त्याने मंगळवारी दिले. विशेष म्हणजे धोनीने २०१९ नंतर चेन्नईत आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही.
इंडिया सिमेंट्सच्या हिरक महोत्सवा (७५ वा वर्धापनदिन) निमित्त झालेल्या समारंभात धोनीने फॅन्सशी संवाद साधला. तो म्हणाला, की निवृत्तीबाबत बोलायचे झाल्यास फॅन्स मला सीएसकेच्या संघात खेळताना पाहू शकणार आहेत. तो माझा अंतिम सामना असू शकतो. तेव्हा तुम्हाला निरोप देण्याची संधी मिळेल. मला चेन्नईमध्ये खेळण्याची आशा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील हंगामाच्या लिलावात सीएसके कर्णधार धोनी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना संघात कायम ठेवणार आहे.
निवृत्तीनंतर बॉलिवूडमध्ये जायचा कोणताही विचार नाही, असे धोनीने म्हटले आहे. एका फॅन्सच्या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, की तुम्हाला ठाऊक आहे की बॉलिवूड वास्तवात खूपच कठिण क्षेत्र आहे. जाहिरातींमध्ये काम करायचे म्हटल्यास त्या मी करू शकतो. चित्रपटांबाबत म्हणत असाल तर हे काम खूपच कठिण क्षेत्र असून त्यामध्ये काम करणे खूप अवघड आहे.