मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल २०२२ हंगामासाठी दोन दिवस चाललेली मोठी लिलावप्रक्रिया पार पडली आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंवर बोली लावण्यात आली. श्रेयस अय्यर, ईशान किशन, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर या भारतीय युवा खेळाडूंवर यंदा पैशांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन याच्यावर मुंबई इंडियन्सने जोरदार बोली लावून त्याला तब्बल १५.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. हैदराबाद संघाच्या संघमालकांनी ईशानला खरेदी करण्यासाठी जोरदार बोली लावली. यादरम्यान मुंबई इंडियन्स आणि हैदराबादमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. परंतु अखेर मुंबईने ईशानला खरेदी करण्यात यश मिळवले. आयपीएलच्या इतिहासात ईशान किशन सर्वात महाग विक्री झालेला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
यापूर्वी ईशान किशन मुंबई इंडियन्स याच संघाचा भाग होता. संघाने त्याला रिटेन केले नव्हते. तो या लिलावात आतापर्यंत विक्री झालेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर याला १२.२५ कोटी रुपयांत कोलकाता नाइट रायडर्स संघाने खरेदी केले. त्याचा बेस प्राइज दोन कोटी रुपये होता. ईशान किशन २०१६ मध्ये गुजरात लायन्सने ३५ लाख रुपयांनी खरेदी केले होते. २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ६.२ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मुंबईने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास टाकला आहे. ईशान किशन यष्टीरक्षकच नव्हे, तर दमदार सलामीचा फलंदाजही आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ६१ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १४५२ धावा काढल्या आहेत. ९९ ही आयपीएलमधील ईशानची सर्वोच्च धावसंख्या आहे.