बंगळुरू (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रिमिअर लिग २०२२चा लिलाव सध्या येथे सुरू आहे. मात्र, या भव्य समारंभात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे, लिलावाचे सूत्रसंचालक ह्यू एडमीडस हे सूत्रंचालन करीत असताना अचानक कोसळले. त्यामुळे लिलाव तात्पुरता थांबविण्यात आला आहे. ह्यू यांची प्रकृती स्थिर आहे. थोड्याच वेळात लिलाव पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयपीएलचा पंधरावा सिझन यंदा सुरू होणार आहे. याच सिझनसाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया दोन दिवस होत आहे. या लिलावाला आज प्रारंभ झाला. पहिल्या सत्रात लिलाव सुरळीत पार पडले. मात्र, दुपारच्या सुमारास श्रीलंकेचा गोलंदाज आणि फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात होती. त्याचवेळी सूत्रसंचालक ह्यू एडमीड्स हे अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे तातडीने लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली. ह्यू यांच्यासाठी तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. याचदरम्यान, लंचची घोषणा करण्यात आली. आता ह्यू यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे थोड्याच वेळात पुन्हा लिलाव सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ह्यू यांचा दांडगा अनुभव आहे. तब्बल ३५हून अधिक वर्षांपासून ते लिलाव समारंभाचे सूत्रसंचलन करीत आहेत. जागतिक पातळीवरील तर तब्बल अडीच हजारापेक्षा अधिक लिलावांचे त्यांनी सूत्रसंचलन केले आहे.