मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाच्या आयपीएल हंगामात पंचाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लागत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सदरम्यान झालेल्या सामन्यातही पंचाच्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. सामन्याच्या शेवटच्या षटकात हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हा ड्रामा नो बॉलवरून सुरू झाला. शेवटच्या षटकात पंचाने नो बॉल दिला नाही. दिल्लीला विजयासाठी ६ चेंडूत ३६ धावा हव्या होत्या. रोवमॅन पॉवेल याने पहिल्या तीन चेंडूत सलग तीन षटकार ठोकले आणि दिल्लीला विजयाजवळ आणून ठेवले होते.
ओबेद मॅककॉय याने फुलटॉस चेंडू टाकला. हा चेंडू नो बॉल देण्याची मागणी दिल्ली संघाने केली. परंतु मैदानावरील पंचाने नो बॉल दिला नाही. दूरचित्रवाणी पंचांच्या माध्यामातून बॉलची फेरपडताळणी करण्याची मागणी करण्यात आली, परंतु पंचाने त्यांनी मागणी मान्य केली नाही. त्यानंतर ऋषभ पंत याने पॉवेल आणि कुलदीप यादव यांना मैदानाबाहेर येण्याचा इशारा केला. गोलंदाजी प्रशिक्षक शेन वॉट्सन याने पंतजवळ जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पंत येथेच थांबला नाही, त्याने जोस बटलरसोबतही हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
दिल्लीचे फलंदाजीचे प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी मैदानात घुसून पंचांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतरही पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली नाही आणि आम्रे यांना मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. आम्रे मैदानाबाहेर गेले आणि सामना पुन्हा सुरू झाला. नो बॉलच्या त्या निर्णयावरून आता वाद उफाळला आहे. तो चेंडू पॉवेलच्या कंबरेच्या आसपास होता. या वादानंतर पॉवेलला चौथा चेंडू खेळता आला नाही. पाचव्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पॉवेलने संजू सॅमसनला झेल दिला आणि त्याने तो सहज टिपला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना १५ धावांनी गमावला.