मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. २००८ साली सुरू झालेल्या या लीगच्या प्रेक्षक संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बक्षिसांच्या बाबतीतही या लीगने वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लीगच्या प्रत्येक मोसमात, फ्रँचायझी मोठ्या रकमेची बोली लावून भारतातून आणि परदेशातील खेळाडूंना खरेदी करतात. त्याच वेळी, हंगाम संपेपर्यंत, विजेत्या संघापासून ते साखळी फेरीत बाहेर पडलेल्या संघापर्यंत, त्यांना कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळतात.
या लीगच्या पहिल्या दोन हंगामात विजेत्या संघाला ४.८ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला २.४ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. गेल्या मोसमातील विजेता संघ गुजरात टायटन्सला २० कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२३ मध्ये एकूण ४६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. आयपीएल विजेच्या संघाला २० कोटी रुपये आणि ट्रॉफी मिळेल. अंतिम सामन्यातील पराभूत संघाला १३ कोटी रुपये मिळतील. सर्वाधिक धावा करणाऱ्या (ऑरेंज कॅप) आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या (पर्पल कॅप) विजेत्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये आणि स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपये मिळतील. या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडूला १२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. सुपर स्ट्राइक पुरस्कार जिंकणाऱ्याला १५ लाख रुपये दिले जातील.
आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रविवार, २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी, चेन्नईने क्वालिफायर-१ सामन्यात गुजरातचा १५ धावांनी पराभव केला. क्वालिफायर-२ सामन्यात, गुजरातने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले. चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत चार सामने झाले असून त्यात चेन्नईने एक तर गुजरातने उर्वरित तीन सामने जिंकले आहेत.
IPL 2023 Winner Prize Money Lakh Crore