मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या अंतिम चार सामन्यांचा थरार उद्यापासून (मंगळवार) अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये कोणते संघ जातील, हे रविवारी स्पष्ट झाल्यानंतर सोशल मिडियावरही जोरदार चर्चा रंगत आहे. प्लेऑफ आणि फायनलचे वेळापत्रक आता तयार झाले आहे. त्यामुळे कुणाचे पारडे जड याची उत्सुकता सर्वांना आहे.
गुजरात आणि बंगळुरू यांच्यातील सामना मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. कारण बंगळुरूने या सामन्यात विजय मिळवला असता तर मुंबई प्ले-अॉफच्या शर्यतीतून बाहेर पडले असते. पण गुजरातने बंगळुरूला पराभूत करत मुंबईला तारले अश्या आशयाचे मिम्स आता सोशल मिडियावर बघायला मिळत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये खऱ्या अर्थाने शेवटच्या सामन्यापर्यंत प्ले-ऑफसाठी संघ निश्चित व्हायचे होते.
सुरुवातीला फक्त गुजरातच प्ले-अॉफला पोहोचले. त्यानंतर अगदी अखेरच्या सामन्यात चेन्नईने आपले स्थान निश्चित केले. बंगळुरूने अखेरच्या सामन्यात आपले स्थान गमावले आणि त्याच सामन्याच्या जोरावर मुंबईने प्ले-अॉफमध्ये धडक दिली. त्यामुळे आता प्ले-ऑफमध्ये गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई असे चार संघ पोहोचले आहेत. यात पहिला सामना २३ मे रोजी गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार आहे. खरे तर हा हाय व्होल्टेज सामना असणार आहे.
कारण गुजरातने १४ पैकी १० सामने जिंकले आहेत. ही यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. कारण चेन्नई, लखनौ आणि मुंबईला प्रत्येकी आठच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे पहिलाच प्ले-ऑफचा सामना हार्दिक पांड्या विरुद्ध महेंद्रसिंग धोनी यांच्यात रंगणार असल्याने धोनीच्या चाहत्यांसाठी हीच फायनल असणार आहे. यातून गुजरातने अंतिममध्ये धडक दिल्यास धोनीच्या चाहत्यांचा आयपीएलच्या अंतिम सामन्यातून रस निघून जाईल. पण धोनीने विजय मिळवला तर आयपीएलचा अंतिम सामना हा देशातली सर्वांत मोठा इव्हेंट ठरणार आहे, हे निश्चित.
https://twitter.com/IPL/status/1660514240258801665?s=20
प्रतिष्ठा पणाला
आयपीएल सुरू झाले तेव्हा मुंबईची कामगिरी अत्यंत वाईट होती. पण त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक करत प्ले-अॉफमध्ये धडक दिली. पण त्यांच्यापुढे लखनौसारखा जबरदस्त संघ आहे. लखनौचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यांच्या भांडणानंतर लखनौ संघात वेगळीच एनर्जी बघायला मिळत आहे. सोशल मिडियावर सतत एकमेकांना ट्रोल केले जात आहे. अश्यात आयपीएल जिंकून विराट कोहलीला डिवचण्याचे स्वप्न गंभीर आणि नवीन उल-हकने बाळगले असेल. त्यामुळे चेन्नईत रंगणाऱ्या या सामन्यात लखनौची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल.
कोण कोणाशी भिडणार?
प्लेऑफबद्दल बोलायचे झाले तर, सर्वप्रथम क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. यानंतर चेन्नईतच मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. क्वालिफायर-२ हा क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-१ च्या विजेत्याशी अंतिम सामना खेळेल.
प्लेऑफचे वेळापत्रक असे
२३ मे
क्वालिफायर-१… गुजरात विरुद्ध चेन्नई… चेन्नई… संध्याकाळी ७.३० वा
२४ मे
एलिमिनेटर…. लखनौ विरुद्ध मुंबई…. चेन्नई…. संध्याकाळी ७.३० वा
२६ मे
क्वालिफायर २…अहमदाबाद…. संध्याकाळी ७.३० वा
२८ मे
फायनल….अहमदाबाद…. संध्याकाळी ७.३० वा
https://twitter.com/IPL/status/1660369195945832448?s=20
IPL 2023 Playoff Schedule Teams