मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरुवातीचे तीन सामने जिंकल्यानंतर सलग पराभवाचा सामना करणाऱ्या केकेआरने मागचे दोन्ही सामने जिंकून आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे आता बंगळुरू, मुंबई, पंजाब या संघांसाठी केकेआरची झेप डोकेदुखी ठरणार आहे.
मुळात यंदाचे आयपीएल पूर्णपणे अनिश्चिततेसाठी ओळखले जाणार आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, याचा अंदाजच कुणाला घेता येत नाहीये. शेवटच्या बॉलवर षटकार खेचणे असो वा अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार खेचणे असो. प्रतिस्पर्धी संघाचा पराभव झालेला आहे, असे वाटत असतानाच स्वप्नात घडल्याप्रमाणे सामना पलटी मारतो. अगदी हीच परिस्थिती गुणतालिकेच्या बाबतीत होत आहे.
सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये दमदार विजय प्राप्त केल्यानंतर केकेआर टॉपला जाऊन बसले होते. पहिल्या तीनमध्ये पोहोचलेल्या केकेआरला नंतर मोमेंटम कायम ठेवता आला नाही. त्यानंतर सलग पराभवांचा सामना केला आणि गुणतालिकेत तळाला जाऊन बसले. ज्या मुंबईचा क्रमांक दहावा होता तो मुंबईचा संघ थेट पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर येऊन पोहोचला.
आणि केकेआर तळाशी दिल्लीसोबत बसले होते. त्यामुळे आता उर्वरित सगळेच सामने जिंकणे केकेआरला आवश्यक होते. त्यानुसार गेल्या सामन्यात कोलकाताने हैदराबादला पाच धावांनी मात दिली आणि आशा पल्लवित ठेवल्या. पण तेवढ्याने काहीच होणार नव्हते. तळाशी असलेले संघ त्यांना अस्वस्थ करत होते. त्यामुळे सोमवारचा सामना करो या मरो अश्या परिस्थितीचा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला गेलेल्या या सामन्यात रिंकू सिंगने विजयी चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.
थेट पाचव्या क्रमांकावर
केकेआरकडे अवघे आठ गुण होते. कालचा सामना जिंकल्यानंतर फार तर दहा गुण होणार होते. आणि दहा गुणांची कमाई केलेले चार संघ आधीपासूनच गुणतालिकेत होते. पण केकेआर धावगतीमध्ये उत्तम होते. त्यामुळे त्यांना फक्त सामना जिंकायचा होता. त्यानुसार पंजाबवर मात करताच केकेआर थेट पाचव्या क्रमांकावर जाऊन बसले.
आरआरआरचा माहोल
प्रथम फलंदाजी करताना पंजाबला सतराव्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. या सतरा षटकांमध्ये केकेआरच्या फिरकीपटूंनी उत्तम कामगिरी केली. तरीही शेवटच्या दोन-तीन षटकांमध्ये पंजाबने १८० धावा फलकावर लावल्या. याचा सामना करताना राणा, रशेल आणि रिंकू अर्थात आरआरआरने या तिघांनी केकेआरच्या पारड्यात विजय टाकला.
IPL 2023 Play Off Teams KKR Victory