नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबत चोरीची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या क्रिकेट किटमधून बॅट आणि पॅडसह इतर अनेक वस्तू चोरीला गेल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीची टीम बेंगळुरूहून दिल्लीला परतत होती. याच दरम्यान, खेळाडूंचे सामान चोरीला गेले.
दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्टच्या किटमधून प्रत्येकी तीन बॅट गायब झाल्या आहेत. त्याचवेळी मिचेल मार्शच्या दोन बॅट्स गेल्या आहेत. तरुण यश धुलने किमान पाच बॅट गमावल्या आहेत. दुसर्या दिवशी जेव्हा खेळाडूंचे सामान त्यांच्या हॉटेलच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना चोरी झाल्याची माहिती मिळाली. परदेशी खेळाडूंनी गमावलेल्या बॅटची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये आहे.
अनेक खेळाडूंचे बूट आणि हातमोजेही चोरीला गेले आहेत. सामान चोरीला गेले असतानाही दिल्लीचे खेळाडू कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करत आहेत. पोलिसांची मदत कशी घेता येईल आणि चोरीला गेलेला माल परत मिळवता येईल की नाही, याबाबत दिल्लीची टीम सध्या विचार करत आहे. आयपीएल 2023 मध्ये, दिल्ली संघ सलग पाच सामने गमावला आहे आणि गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दिल्लीचा पुढील सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सशी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
आयपीएल 2023 आतापर्यंत दिल्ली संघासाठी विविध कारणाने वेगळे ठरले आहे. कारण, या संघाचा नियमित कर्णधार ऋषभ पंत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एका कार अपघाताचा बळी ठरला होता आणि या वर्षाच्या अखेरीस तो मैदानात परतणार आहे. नवा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाला आतापर्यंत लय पकडता आलेली नाही. दिल्लीला अजूनही पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. आता दिल्लीसाठी प्लेऑफचा मार्गही कठीण झाला आहे. गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित बहुतांश सामने जिंकावे लागतील. दिल्लीसाठी हे मोठे आव्हान असेल.
https://twitter.com/ani_digital/status/1648622685537157120?s=20
IPL 2023 Delhi Capitals Team 14 Lakh Kit Theft