मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई इंडियन्सने प्रथमच प्लेइंग-11 मध्ये आज त्याचा समावेश केला आहे. अर्जुनला आयपीएलच्या 16व्या हंगामातील 22व्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुनला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्याला 25 लाख रुपयांमध्ये संघात समाविष्ट करण्यात आले. सलग दोन हंगाम बेंचवर बसल्यानंतर त्याला आज अखेर संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्सचा कार्यवाहक कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून कोलकाताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार रोहित शर्मा पोटाच्या समस्येमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सतत वडील सचिन तेंडुलकरसोबत ट्रेनिंग सेशनमध्ये दिसत होता. तो डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. अर्जुन याआधी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए मॅच खेळला आहे. आता त्याचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
अर्जुनने 2021 मध्ये हरियाणाविरुद्ध पहिल्यांदाच मुंबईकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने गोव्यासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले आणि पुढील महिन्यात राजस्थान विरुद्ध रणजी ट्रॉफी खेळली. अर्जुनने सात प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 223 धावा करण्यासोबतच 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने सात लिस्ट ए सामन्यांमध्ये आठ विकेट्स आणि नऊ टी-20 सामन्यांमध्ये 12 बळी घेतले आहेत.
दोन्ही संघाचे खेळाडू असे
कोलकाता नाइट रायडर्स :
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.
पर्यायः मनदीप सिंग, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, डेव्हिड विसे.
मुंबई इंडियन्स:
इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (क), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, ड्वेन यान्सेन, रिले मेरेडिथ.
पर्यायः रोहित शर्मा, रमणदीप सिंग, अर्शद खान, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय.
IPL 2023 Cricketer Arjun Tendulkar Dream Debut Mumbai Indians