मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या यंदाच्या हंगामात फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)ला हिरव्या रंगाची जर्सी (गणवेश) पावली आहे. त्यामुळेच आरसीबी आता थेट आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारणार असल्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास आयपीएलचा चषक पटकविण्यासाठी आरसीबी मुख्य दावेदार राहणार असल्याचे बोलले जात आहे.
येथील वानखेडे मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात आरसीबीच्या संघाने हैदराबादवर ६७ धावांनी विजय मिळविला आहे. आरसीबीचा संघ २०११ पासून आयपीएलच्या एकाच सामन्यामध्ये हिरव्या रंगाची जर्सी परिधान करतो. मात्र, आजवरचा इतिहास पाहता हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीला फारसे यश मिळालेले नाही. आजवर आरसीबीने हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये एकूण १२ सामने खेळले आहेत. त्यातील केवळ तीन सामन्यांमध्येच आरसीबीने विजय मिळविला आहे. यातील एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर, एका सामन्यात आरसीबीने हिरव्या ऐवजी निळ्या रंगाची जर्सी परीधान केली होती. मात्र, हिरव्या रंगाच्या जर्सीत आरसीबीने जेव्हा जेव्हा सामना जिंकला आहे तेव्हा आरसीबीचा संघ थेट अंतिम फेरीत गेला आहे. यंदाही तसेच चित्र आहे. आरसीबीने या मोसमात १२ पैकी ७ सामने जिंकले असून आता संघाच्या नजरा थेट अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत.
हिरव्या रंगाची जर्सी का
आरसीबी संघाने हिरवी जर्सी परिधान केली कारण संघाला संपूर्ण जगाला संदेश द्यायचा आहे की, तुम्ही कोणत्याही किंमतीत पर्यावरणाचे रक्षण करा आणि जगभरात हिरवळ आणली पाहिजे. पर्यावरण सुरक्षित असेल तर आपण सर्व सुरक्षित राहू. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले, तर अशी वेळ येईल की, पिण्यासाठी पाणी नाही, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवाही राहणार नाही. अशा परिस्थितीत आनंदी जीवनाची कल्पना करणे निरर्थक ठरेल.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने या हंगामातील ग्रीन जर्सी सामन्यासाठी दोन हॅशटॅग देखील चालवले आहेत. RCB फ्रँचायझीने #GoGreen आणि #ForPlanetEarth ट्रेंडचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी हैदराबादविरुद्ध दुपारी ३.३० वाजता संघ मैदानात उतरेल. त्यानंतर सर्व खेळाडू हिरव्या जर्सीत दिसतील.