मनीष कुलकर्णी, मुंबई
‘येथे प्रतिभेला संधी मिळते’ हे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे आदर्श वाक्य आहे. आयपीएलच्या चमकणाऱ्या चषकावरही हेच वाक्य लिहिले आहे. आयपीएलचा २०२२ चा हंगाम या वाक्याला सार्थ ठरला आहे. हंगामात काही जबरदस्त प्रतिभेचे युवा गोलंदाज चमकले. गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या भारताचा संभाव्य कर्णधार म्हणून दावा करण्यास यशस्वी ठरला आहे.
सनरायजर्स हैदराबादचे पहिल्यांदाच संपूर्ण हंगामाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमरान मलिकने सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. त्याच्या वेगावान गोलंदाजीच्या या क्षमतेने जगाचे लक्ष वेधले. तसेच भारतीय निवड समितीचे सदस्यही प्रभावित झाले. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी उमरानची निवड झाली आहे. डावखुरा मध्यमगती गोलंदाज मोहसीन खानने लखनऊ सुपर जाएट्ंससाठी दमदार कामगिरी केली आहे.
मोहसीन खानने वेग आणि अचूक गोलंदाजीचे सातत्य राख सर्वांनाच प्रभावित केले. गोलंदाजीत त्याने प्रति षटकात ६ पेक्षा कमी धावा दिल्या आहेत. त्याशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग, गुजरात टायटन्सचा यश दयाल आणि राजस्थान रॉयल्सचा कुलदीप सेन यांचासुद्धा जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये आपली छाप पाडणाऱ्या भारतीय वेगवान गोलंंदाजात समावेश होता. काही युवा फलंदाजांनीसुद्धा वरच्या क्रमांकावर खेळण्यास सक्षम आहे, हे दाखवून दिले.
यामध्ये मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्माने त्याचे कौतुकही केले आहे. रोहितने या डावखुऱ्या फलंदाजाला भारतीय संघात खेळण्याचा दावेदार असल्याचे सांगितले. पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक जितेश शर्माचा खेळ भारताचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग याला खूपच भावला. त्यांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसला तरी त्यांनी संधीचा चांगला फायदा घेतला आणि विषम परिस्थितीतही धावा केल्या.
आयपीएलमध्ये यापूर्वी खेळलेल्या अनकॅप्ड खेळाडूंपैकी राहुल त्रिपाठी आणि अभिषेक वर्मा यांनी आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. राहुल त्रिपाठीला आगामी दक्षिण अफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली नाही. हार्दिक पंड्या याने भारतीय संघाचा कर्णधार होण्याची दावेदारी सिद्ध केली आहे. एखाद-दुसरा क्षण सोडला तर तो आयपीएलमध्ये शांत दिसला. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे.
या खेळात वय हा एक आकडा आहे, हे आयपीएलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अनुभवी उमेश यादव, रिद्धिमान साहा आणि दिनेश कार्तिक यांना दमदार कामगिरीमुळे कायम लक्षात ठेवले जाईल. कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी फिनिशरची भूमिका निभावल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. उमेशने स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. तर वृद्धिमान साहा याने गुजरात टायटन्ससाठी सलामीला येऊन चांगली सुरुवात करून दिली आहे.