पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या १५ व्या हंगामात पदार्पण करून आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित करणाऱ्या गुजरात टायटन्स या संघाने प्लेऑफचे तिकीट बुक केले आहे. गुजरातच्या संघाने पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये मंगळवारी रात्री झालेल्या ५७ व्या लीग सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा ६२ धावांनी पराभव केला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरातचा पहिला संघ ठरला आहे. अंकतालिकेत आता गुजरातचे १८ गुण झाले आहेत.
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी लखनऊ सुपर जाएंट्स संघाला आणखी संधी मिळणार आहे. लखनऊला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला, तर लखनऊचा संघ अधिकृतरित्या प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. दोन्ही सामन्यांत पराभव झाला तरीही लखनऊची प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी कायम राहणार आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात १६ गुण मिळवलेला कोणताही संघ अद्याप प्लेऑफच्या बाहेर गेलेला नाही.
पुण्यात काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गुजरातने २० षटकात ४ गडी गमावून १४४ धावा केल्या. रिद्धिमान साहाने ५, मॅथ्यू वेडने १०, हार्दिक पंड्याने ११, डेव्हिड मिलरने २६, शुभमन गिलने ६३ आणि राहुल तेवतियाने २२ धावा केल्या. लखनऊकडून आवेश खान याने २ गडी टिपले. तर जेसन होल्डर आणि मेहसिन खान याने प्रत्येकी १ गडी बाद केला.
१४५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाचा डाव १३.५ षटकात ८२ धावा बनवून गडगडला. क्विंटन डिकॉक ११ धावा, कर्णधार के एल राहुलने ८ धावा, करण शर्मा ४, कृणाल पंड्या ५, आयुष बदोनी ८, मार्कस स्टॉयनिस २, जेसन होल्डर १, मोहसीन खान १ आणि दीपक हुड्डा याने २७ धावा केल्या. गुजरातकडून राशीद खानने ४ गडी टिपले. तर यश दयाल आणि आर. साई किशोर यांना प्रत्येकी २-२ गडी बाद केले.