मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या अंतिम टप्प्यात आता सामने रोमांचक होऊ लागले आहेत. लखनऊ सुपर जाएंट्सने (एलएसजी) बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सवर दोन धावांनी मात करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा लखनऊ सुपर जाएंट्स दुसरा संघ ठरला आहे. एलएसजीपूर्वी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये सर्वात प्रथम प्रवेश केला होता. आता उर्वरित दोन जागांसाठी आता राजस्थान रॉयल्स, रॉयस चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील चुरस पाहायला मिळणार आहे.
पुढील चार सामन्यांच्या माध्यमातून इतर दोन संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार आहेत. लखनऊच्या विजयानंतर प्लेऑफचे समीकरण कसे असेल हे जाणून घेऊया. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स १६ गुणांच्या सहाय्याने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरआरचा पुढील सामना २० मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. राजस्थानने जर हा अखेर सामना जिंकला, तर तो थेट प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. परंतु सीएसकेकडून त्यांचा पराभव झाला, तरी प्लेऑफमध्ये पोहोचण्यास त्यांना अधिक संधी आहे. कारण इतर संघांच्या तुलनेत राजस्थानचा नेट रनरेट चांगला आहे. १३ सामन्यांनंतर आरआरचा नेट रनरेट +०.३०४ आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा अखेरचा सामना २१ मे रोजी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. मुंबईचा पराभव करण्यात दिल्लीला यश मिळाले तर दिल्लीचा संघ आरसीबी, पंजाब आणि हैदराबाद यांचे गणित बिघडवून थेट प्लेऑफमध्ये पात्र ठरणार आहे. दिल्लीचे १४ गुण असून, संघ चौथ्या स्थानावर आहे. मुंबईचा पराभव केला तर दिल्ली १६ गुणांवर पोहोचणार आहे.
उर्वरित तीन संघांपैकी आरसीबी संघाला १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. परंतु त्यांचा नेट रनरेट दिल्लीच्या तुलनेत चांगला नाही. दिल्लीचा नेट रनरेट १३ सामन्यांनंतर +०.२५५ आहे. तर इतक्याच सामन्यांनंतर आरसीबीचा नेट रनरेट -०.३२३ आहे. आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल, तर त्यांना गुजरातचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. दोन्ही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाले, तर नेट रनरेटवर तिढा निर्माण होणार आहे.