मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आयपीलच्या १५ हंगांमांपैकी सर्वाधिक तब्बल पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर फेकली गेली आहे. आयपीएलचा स्वप्नवत वाटणारा प्रवास इतक्या लवकर संपावा यावर मुंबईच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये.आयपीएलच्या ३७ व्या सामन्यात मुंबईला लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्ध ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामातील मुंबईचा हा सलग आठवा पराभव ठरला.
मुंबई स्पर्धेत सहाव्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकली नाही. त्यापूर्वी २००८, २००९, २०१६, २०१८ आणि २०२१ या वर्षांत मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकली नव्हती. भारतीयांसह जगातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला मुंबईचा संघ एकाएकी तळाशी का गेला, याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची सलामी जोडी अजूनही विशेष कामगिरी करू शकली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि कोट्यवधींची बोली लागलेला ईशान किशन ही जोडी मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरली आहे. स्पर्धेतील आठ सामन्यात रोहित शर्माने १५३ धावा, तर ईशान किशनने १९९ धावा केल्या आहेत. ठोस सुरुवात मिळू न शकल्यामुळे पुढील फलंदाजांवर दबाव वाढत गेला. या दबावात फलंदाज एकामागून एक बाद होत होते. सलग आठ सामने पराभूत झाल्यानंतरही कोणताही फलंदाज जबाबदारी घेण्यास पुढे आला नाही, हे शल्य रोहित शर्माने बोलून दाखवले.
हार्दिक आणि कृणाल पंड्या ही भावंडे मुंबई संघातून बाहेर गेल्यानंतर अष्टपैलू खेळाडूंची वानवा दिसून आली. कायरेन पोलार्डसुद्धा एकटा विशेष काही करू शकला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात तो प्रभावहीन दिसून आला. हार्दिक आणि कृणाल हे दुसऱ्या संघात गेल्यानंतर त्यांची जागा भरण्यास मुंबई संघ व्यवस्थापनाला अपयश आले आहे. खालच्या क्रमावर येणारा एकही खेळाडू स्फोटक फलंदाजी करू शकला नाहीये.
येथे आणखी एक गोष्ट मुंबईच्या चाहत्यांना सलत आहे की, मागील काही हंगामात चांगली कामगिरी करणारे अनेक चांगले खेळाडू इतर संघात गेले. त्याच तोडीचे खेळाडू संघात घेण्यास मुंबईच्या संघमालकांना अपयश आल्याचे मुंबईचे चाहते बोलत आहेत. तसेच फलंदाजी, गोलंदाजीतील गुणवाण खेळाडू अपयशी ठरले आहेत. या सर्व बाबींचा विपरित परिणाम संघावर झाल्याचे बोलले जात आहे.