मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वच क्रिकेट प्रेमींच्या उत्सुकतेचा आणि आवडीचा विषय असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेIPL 2022ची घोषणा झाली असून वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ब्रॉडकास्टरच्या आदेशाचे पालन करत दि. 26 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. ही लीग स्पर्धा एकूण 65 दिवस चालणार असून अंतिम सामना दि. 29 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत फक्त लीग स्टेजचे ठिकाण जाहीर करण्यात आले असून प्लेऑफचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
साखळी टप्प्यातील 70 सामन्यांच्या ठिकाणाबाबत बोलायचे झाले तर मुंबईत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यात होणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि लीगच्या सुरू आणि समाप्तीच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, लीगचे पूर्ण वेळापत्रक येणे बाकी आहे. आयपीएल 2022 लीग टप्प्यातील 20-20 सामने मुंबईतील वानखेडे ( 20 ) आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर ( 20 ) सामने होणार आहेत. त्याचवेळी ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत. चार प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बैठकीत निश्चित करण्यात आले असले तरी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
तारखांची माहिती देताना, आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी क्रिकबझला सांगितले की, ‘यावेळी आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतील. मात्र, प्रेक्षक 50 टक्के असतील की 25 टक्के असतील याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार स्टेडियमच्या क्षमतेनुसार प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे. लवकरच स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रकही जाहीर केले जाईल. विशेष म्हणजे येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयपीएल 2022 मध्ये प्रथमच 10 संघ सहभागी होत आहेत. या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ लीगचा भाग बनले आहेत. यापूर्वी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी लीगसाठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू होता आणि त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.