इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधणारा गुजरात टायटन्सन आणि १४ वर्षांनंतर पुन्हा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर करण्यास उत्सुक असलेला राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे विजेतेपद नावावर करण्यासाठी आज सायंकाळी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आमनेसामने येणार आहेत. गेल्या दोन महिन्यात ७३ लीग सामने समाप्त झाल्यानंतर आता अंतिम सामन्याच्या उंबरठ्यावर आलेल्या दोन्ही संघांचे बरेच काही पणाला लागले आहे.
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात सोनेरी सुरुवात करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. तर अनेक दिग्गज संघांना पाणी पाजणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला नवा इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. गुजरातचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या आणि राजस्थानचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन हे पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात उतरणार आहेत आणि दोघांनाही विजेतेपदावर नाव कोरण्याची इच्छा असेल.
आपल्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिलेल्या कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्यासाठी गेले दोन महिने कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी ठरलेले नाहीत. लिलाव झाल्यानंतर पारख न करता हा संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर असेल असे मानणाऱ्या क्रिकेट पंडित आणि टीकाकारांना संघाने आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अलौकिक कामगिरी करणारा फलंदाज राहुल तेवतिया आणि कामगिरीत सातत्य नसणाऱ्या डेविड मिलर यांसारख्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ कागदावर भक्कम दिसत नव्हता. परंतु दुखापतीतून तंदुरुस्त होऊन संघात परतलेल्या हार्दिकने आपली क्षमता सिद्ध केली आहे. हार्दिकने फलंदाजीत ४५.३० च्या सरासरीने ४५३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने पाच गडीही टिपले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून लय मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डेविड मिलरने सर्वांनाच आश्चर्यचकित करत १५ सामन्यात ६४.४१ च्या सरासरीने ४४९ धावा खेचल्या.
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल विजेतेपद जिंकरणारा राजस्थान रॉयल्सने या वेळी संजू सॅमसनच्या नेतृत्वात विजेतेपदावर नजरा खिळवून ठेवल्या आहेत. तसे पाहिले तर संजू सॅमसन याने भारताकडून २० सामनेही खेळलेले नाहीत. परंतु कर्णधार म्हणून त्याने अनुभवी आणि युवा खेळाडूंमध्ये समन्वय ठेवून संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले आहे. संजूने २९.६० च्या सरासरीने ४४४ धावा केल्या आहेत. राजस्थान संघात अश्विन, चहल, ट्रेंट बोल्ट आणि बटलर सारखे दिग्गज खेळाडू आहेत. तर प्रसिद्ध कृष्णा आणि यशस्वी सारख्या युवा खेळाडूंच्या जोरावर राजस्थानने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.
येथे पाहता येईल
आयपीएलचा महाअंतिम सामना आज रात्री आठ वाजता सुरू होईल. तत्पूर्वी साडेसात वाजता नाणेफेक होईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होत आहे. स्टार स्पोर्ट नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. वेगवेगळ्या भाषेतूनही हा सामना पाहता येईल. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहण्याची सुविधा आहे.
राजस्थान रॉयल्स संघ:
संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मेकॉय, युझवेंद्र चहल, करुण नायर, जेम्स नीशम, रॅस वन डर दुसेन, कॉर्बिन बॉश, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, अनुनय सिंह, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल.
गुजरात टायटन्स संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, प्रदीप संगवान, वरुण आरोन, जयंत यादव, विजय शंकर, गुरकीरत सिंह मान, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन.