मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – सध्या देशभरात आयपीएल फिव्हर सुरू आहे. तसेच कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो आणि कोण खराब कामगिरी करतो, याची देखील चर्चा सुरू आहे. परंतु त्याच वेळी कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळतात? याबाबत देखील प्रचंड चर्चा होत असते. त्याचप्रमाणे संघा बाहेर कोण गेले याची ही प्रेक्षकांना उत्सुकता असते.
IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, स्पर्धेतील जुन्या 8 संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले होते. यातील बहुतांश खेळाडू सामने खेळत आहेत, मात्र करोडो रुपये मिळालेले पाच खेळाडू आता संघाबाहेर आहेत. या यादीतील नवे नाव व्यंकटेश अय्यर याचे आहे, त्याला कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून वगळले होते, तसेच तो बराच काळ मैदानाबाहेर होता.
IPL 2021 च्या कामगिरीच्या आधारे, प्रत्येक संघाने आपले काही महत्त्वाचे खेळाडू कायम ठेवले, यामध्ये व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, अब्दुल समद, एनरिक नोरखिया आणि यशस्वी जैस्वाल यांच्या नावांचा समावेश होता, परंतु आता आपापल्या संघातून बाहेर आहेत.विशेष म्हणजे या खेळाडूंना अनेक संधी मिळाल्या, मात्र हे खेळाडू अपयशी ठरले आहेत.
दरम्यान, केकेआरने व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 8 कोटी रुपये देऊन कायम ठेवले होते, परंतु हे दोन्ही खेळाडू आता प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादने अब्दुल समदला 4 कोटींमध्ये कायम ठेवले, पण त्यालाही काही सामन्यांनंतर संघातून वगळण्यात आले.
या यादीत राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावाचाही समावेश आहे, त्याला 4 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सने एनरिक नोरखियाला 6.50 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. त्यापैकी नॉर्खिया हा एकमेव खेळाडू आहे ज्याला या हंगामात फक्त एकच सामना खेळायला मिळाला. तो आधी आणि नंतरही जखमी झाला होता.