नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रणजीपटू सत्यजित बच्छाव याची इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) २०२२च्या लिलावासाठी निवड झाली आहे. १२ व १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएल हंगामासाठी हा महालिलाव होणार आहे. ३७० भारतीय खेळाडूंसह, १४ सहयोगी देशातील २२० मिळून, एकूण ५९० क्रिकेटपटूंवर यात बोली लागणार आहे. दहा संघांनी खेळाडुंची पसंती दर्शवल्यानंतर गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेली आधीची १२१४ खेळाडुंची यादी कमी झाली.
मागील दोन, तीन रणजी हंगामात केलेल्या उत्कृष्ट , सातत्यपुर्ण कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. यंदाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेत , लखनौ येथे एलिट ए गटातील सामन्यांत सत्यजित ने ६ सामन्यात २२ षटकांत ७ बळी घेतले. स्पर्धेत गोवा व पुदुचेरी संघांविरुद्ध अनुक्रमे ३ व २ बळी घेऊन महाराष्ट्र संघाच्या मोठ्या विजयांत महत्वाचा वाटा उचलला. प्रथम श्रेणी सामन्यांत , महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतांना सत्यजितने आतापर्यंत २३ सामन्यांत ७८ बळी घेतले आहेत. ह्यात एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम दोनदा , तर पाच वेळा ४ गडी बाद करण्याची जोरदार कामगिरी नाशिकच्या ह्या डावखुर्या फिरकीपटूने केली आहे. त्याबरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी आपला वाटा उचलत असतो . आतापर्यंत ६७ ह्या सर्वोच्च धावसंख्येसह तीन अर्धशतके झळकावली आहेत.
अशा लक्षणीय कामगिरीमुळेच नाशिकचे क्रिकेट विश्व सत्यजित बच्छाव ला हार्दिक शुभेच्छा देत, सदर आयपीएल महालिलावाची अपेक्षेसह, आतुरतेने वाट पाहत आहे.