मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी बंगळुरू येथे क्रिकेटपटूंचा लिलाव सुरू आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर, ईशान किशन, दीपक चाहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चाहर, शार्दुल ठाकूर या भारतीय क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची बोली लागून त्यांना खरेदी करण्यात आले. दहा संघांनी ९७ क्रिकेटपटूंवर बोली लावली ७४ क्रिकेटपटूंना वेगवेगळ्या संघात स्थान मिळाले, तर २३ क्रिकेटपटूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. क्रिकेटच्या या झगमगाटात क्रिकेटपटूंवर पैशाचा वर्षाव होत असला तरी कोट्यवधी किंवा लाखोंची बोली लावलेल्या क्रिकेटपटूंच्या हातात नेमके किती पैसे येतात, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच पडतो. त्यामुळे आपण मिळालेल्या पैशांंवर भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंना किती कर द्यावा लागतो, हे जाणून घेऊया.
सामान्य नागरिकांप्रमाणे क्रिकेटपटूंनाही कर भरावा लागतो. कोट्यवधींची बोली लागली तरी त्यावरील कर द्यावा लागतो. बोलीच्या वेळी मिळणाऱ्या रकमेतून टीडीएसटी कपात केली जाते. भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेतील टीडीएस कापला जातो. मिळणाऱ्या रकमेच्या दहा टक्के टीडीएसची कपात होते. त्यानंतर आयटीआर दाखल करावा लागतो. यामध्ये खेळाडूंचे इतर उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब असतो. क्रिकेटपटूंना उत्पन्नाच्या आधारावर कर द्यावा लागतो. टीडीएसची गणना फक्त बोली लागणाऱ्या रकमेच्या आधारावर केली जाते. परदेशी क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या उत्पन्नावर २० टक्के टीडीएस द्यावा लागतो. परंतु परदेशी क्रिकेटपटूंना इतर कोणताही कर द्यावा लागत नाही. परदेशी क्रिकेटपटूंना फक्त भारतातील उत्पन्नावरच कर द्यावा लागतो. त्यांना इतर नागरिकांप्रमाणे आयटीआर दाखल करण्याची आवश्यकता नाही. कर कपातीनंतर नेमके किती पैसे हातात येतात याचा प्रत्यक्ष अंदाज लावणे कठीण आहे, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु क्रिकेटपटूंवर बोली रक्कम बेस प्राइस स्वरूपात लागते. कंपनीसोबत खेळाडूंचे करार झालेले असतात. त्यानुसार त्यांना पैसे मिळतात. अकरा खेळाडूंमध्ये समावेश न झालेल्या खेळाडूला वेगळे मानधन दिले जाते.