इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये यावर्षी दहा फ्रेंचाइजींचे संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अहमदाबादच्या संघाचाही समावेश आहे. अहमदाबादच्या नव्या फ्रेंचाइजीच्या संघाने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून निवडले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत खेळणारा हार्दिक पंड्या आता अहमदाबाद संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
आयपीएल २०२१ मध्ये गोलंदाजी न करू शकणारा हार्दिक यंदाच्या हंगामात गोलंदाजी करणार का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः हार्दिक पंड्याने दिले आहे. हार्दिकला या प्रश्नाचे उत्तर विचारले असता तो म्हणाला की, “तो कुठे उभा आहे, हे त्याच्या संघाला चांगलेच ठाऊक आहे”. हार्दिकने या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही. राशीद खान, शुभमन गिल, मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि संघाचे मेंटर गॅरी कर्स्टन यांच्यासह हार्दिक याला वाटते की, त्यांच्या संघाने नव्या वारशाची गाथा लिहावी. कारण उंच शिखरावर जाणे हेच फ्रेंचाइजीचे लक्ष्य आहे.
नव्या प्रवासाबद्दल हार्दिक म्हणाला, की “आम्ही शून्याने सुरुवात करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की नवा वारसा निर्माण करू शकतो. तसेच नव्या संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवू शकतो. याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. हा खूपच रोमांचक प्रवास असेल”. आयपीएलमध्ये आणि भारतीय संघात महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खेळल्यानंतर हार्दिकने ठामपणे सांगितले, की “या सर्व दिग्गजांकडून तो कर्णधारपदाबाबत बरेच काही शिकला आहे”.
हार्दिकच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण त्याने राष्ट्रीय निवडकर्त्यांना सांगितले की, “त्याला पर्यायी गोलंदाज म्हणून निवडकर्त्यांनी निवडू नये. कारण यामुळे त्याच्या गोलंदाचीवरील दबाव वाढत आहे”. परंतु आता एका संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे त्याच्या खांद्यावर अधिकची जबाबदारी आली आहे. त्यामुळे यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पंड्याची फलंदाजीसुद्धा प्रकाशझोतात असेल. परंतु तरीही “आपण फलंदाज म्हणूनच नव्हे, तर गोलंदाज म्हणूनही योगदान देऊ इच्छितो”, असे हार्दिक सांगतो.
हार्दिक सांगतो, की “हे सर्व आव्हानात्मक राहिले आहे. मी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात योगदान देत आलो आहे. मी जेव्हा फक्त फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी काही वेळ मैदानावर घालवू इच्छित होतो. आम्ही सगळेच आव्हानावर प्रेम करतो. आव्हानांचा सामना करणे मला आवडते. टीका चांगली असते. त्याने माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा असतो. परंतु या प्रक्रियेसाठी मी खूप कठोर मेहनत घेतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मी संघासाठी नेहमीच विविध पर्याय देत असतो. अष्टपैलू खेळाडू होण्यावरच माझा भर असेल. काही नाही झाले तरी माझी फलंदाजी कायम चांगली राहील. फलंदाजीपेक्षा गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देणे मला चांगले वाटते”.