मनाली देवरे, नाशिक
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या साखळीत पंजाब किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला आणि २ महत्वाचे गुण मिळवले. सोमवारी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीअमवर खेळला गेला.
केकेआरचा सध्याचा कर्णधार इयॉन मार्गन आणि माजी कर्णधार दिनेश कार्तीक यांच्यावर सध्या केकेआरच्या फलंदाजीची भिस्त आहे. पंजाब विरूध्द देखील एका महत्वाच्या वळणावर हे दोघे फलंदाजीसाठी खेळपट़टीवर एकञ आले आणि पंजाबचा पराभव निश्चीत झाला. १२३ धावांचा पाठलाग केकेआरसाठी अवघड नव्हता. परंतु, अवघ्या १७ धावा झालेल्या असतांना केकेआरचे फॉर्मात असलेले फलंदाल नितीश राणा, शुभमन गिल आणि सुनील नरेन पॅव्हेलियनमध्ये परतवण्यात पंजाबला यश मिळाल्याने पंजाबच्या आशाअपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु त्यानंतर राहूल ञीपाठीने एक बाजु लावून धरत मॉर्गन आणि कार्तीकच्या हातात डाव नेवून सोडला आणि मार्गन (नाबाद ४७ धावा) आणि अखेरीस कार्तीक (नाबाद १२ धावा) या दोघांनी कुठलाही चमत्कार घडू न देता सामना खिशात घातला.
आयपीएलच्या लढतींसाठी आता मैदान बदलले आहे. मुंबई आणि चेन्नई इथल्या मैदानावर आत्तापर्यन्त सामने खेळले गेले. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर पंजाब किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याने या सिझनच्या दुस–या पर्वाची सुरुवात झाली. पंजाबकडे ५ सामन्यात दोन विजय तर केकेआर कडे ५ सामन्यात फक्त १ विजय असा प्रोग्रेस रिपोर्ट घेवून हे दोन्ही संघ मैदानात विजयासाठी उतरले होते.
नव्या खेळपट़टीवर केकेआरने टॉस जिंकून प्रथम क्षेञरक्ष्ाणाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. पंजाबची फलंदाजी मजबुत आहे, परंतु ती कागदावर मजबुत आहे याचा प्रत्यय या सामन्यात आला. २०–२० क्रिकेटचा बादशहा समजणा–या ख्रिस गेलला शिवम मावीने शुन्यावर बाद केल्यानंतर तर पंजाबच्या गोटात चांगलीच घबराट झाली आणि मग पुढे इतर फलंदाजांनी खेळपट़टीवर फक्त हजेरी लावली. १०–१५ धावांच्या फरकाने पंजाबच्या विकेटस पडत गेल्या आणि गेल बाद झाला तेव्हा २ बाद ३८ या धावसंख्येवरून २० षटकात ९ बाद १२३ अशा वाईट अवस्थेत पंजाबचा डाव संपला. केकेआर तर्फे प्रसिध क्रिष्णा, पॅट कमीन्स आणि सुनील नरेन या गोलंदाजांनी पंजाबचा निम्मा संघ तंबूत पाठवून सुरेख कामगिरी केली.
पॅट कमीन्सने दिला मदतनिधी – हरभजनने दिली मोबाईल व्हॅन
पॅट कमीन्स ऑस्टेलियाचा मध्यमगती गोलंदाज. २०१७ पासून आय.पी.एल. खेळणा–या कमीन्सने माणुसकीचे दर्शन घडवीत भारतात सध्या सुरु असलेल्या कोविड परिस्थीतीशी लढा देण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीला ५० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ३० लाख रूपयाचा मदतनिधी दिला. खास करुन या काळात ऑक्सीजनची गरज लक्षात घेवून हा निधी त्यासाठी खर्च व्हावा या हेतूने त्याने ही मदत दिली असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे ही मदत देतांना त्याने आपल्या इतर सहकारी खेळाडूंना देखील अशी मदत देण्याचे आवाहन केले आहे. पॅट कमीन्सची ही मदत आयपीएलसाठी एक चळवळ ठरेल अशी अपेक्षा आहे. हरभजन सिंगने देखील पुण्यात रुग्नांना कोरोना टेस्ट करण्यासाठी एक मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन दिल्याची बातमी आहे.
मंगळवार दि. २७ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
दिल्ली कॅपीटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर – नरेंद्र मोदी स्टेडीअम, अहमदाबाद