मनाली देवरे, नाशिक
सध्या गुणतालिकेत तळाला असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघातला सामना राजस्थान रॉयल्सने ६ गडी राखून जिंकला आणि आठव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या क्रमांकावर उडी घेतली.
केकेआरच्या गोलंदाजांची या सामन्यातल्या दुस–या इंनिंगमध्ये कसोटी लागली. शिवम मावी, पॅट कमीन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि प्रसिध्द क्रिष्णा या पैकी कुणालाही राजस्थानच्या फलंदाजांनी दाद दिली नाही आणि सामन्याच्या १८ व्या षटकात राजस्थानने १३४ धावांचे लक्ष्य पुर्ण करुन सामना जिंकला. कर्णधार झाल्यानंतर संजु सॅमसनच्या या बॅटमधून या सामन्यात पहिल्यांदा विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा निघाल्या. नाबाद ४१ धावांची संजुची खेळी संघासाठी उपयुक्त ठरल्याने हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकून आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी महत्वाचे दोन बळी मिळविले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सची या सिझनची सुरुवात पडझडीनेच झाली आहे. पहिले तीन पराभव आणि नंतर एक विजय. त्यामुळे सहाजिकच या सामन्यात केकेआरला विजयाची प्रचंड गरज होती. राजस्थान रॉयल्सची अवस्था देखील सारखीच. पहिले दोन पराभव, नंतर एक विजय आणि नंतर पुन्हा एक पराभव. सहाजिकच या सामन्यात राजस्थान रॉयल्सला देखील विजयाची प्रचंड गरज होती.
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून केकेआरला फलंदाजी दिली होती. धावांचा पाठलाग करुन सामना जिंकण्याचा राजस्थानचा प्लॅन होता. राजस्थानच्या मा–यासमोर केकेआरला जेमतेम १३३ धावा करता आल्या. नितीश राणा (२२), राहूल ञीपाठी (३६) आणि दिनेश कार्तीक (२५) या केकेआरच्या प्रमुख फलंदाजाना जेमतेम दुहेरी धावसंख्या गाठता आली. परंतु, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचे कौतुक करावे तेव्हढे कमी ठरेल. साउथ आफीकेचा जलदगती गोलंदाज ख्रिस मॉरीसला लिलावात आपल्या संघात घेतांना केकेआरच्या फ्रॅचायझीने सर्वाधीक पैसे मोजले आहेत. या पैशाचे मॉरीस चिज करतोय. या सामन्यात त्याने ४ षटकांच्या संपुर्ण स्पेलमध्ये २३ धावा देवून ४ बळी घेतले. बांग्लादेशचा मुस्तफिजूर रहेमान हा देखील राजस्थानसाठी प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी करतोय. या सामन्यात देखील या मध्यमगती गोलंदाजाने ४ षटकात अवघ्या ५.५० च्या सरासरीने २२ धावा दिल्या आणि १ बळी घेतला.
रविवार दि. २५ एप्रिल २०२१ रोजी होणारे दोन सामने –
सामना क्र.१ चेन्नई सुपर किंग्ज वि.रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर, वानखेडे स्टेडीअम, मुंबई
सामना क्र.२ सनरायझर्स, हैद्राबाद वि. दिल्ली कॅपीटल्स, एम.ए.चिंदबरम स्टेडीअम, चेन्नई