मनाली देवरे, नाशिक
साखळीतील एका महत्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडीयन्सचा ६ गडी राखून पराभव केला. मुंबई इंडीयन्स आणि दिल्ली कॅपीटल्स या दोन संघामध्ये मागच्या वर्षीच्या आयपीएल सिझनमध्ये एकूण ४ सामने झाले होते. त्यापैकी एक सामना हा अंतिम सामना होता. या चारही सामन्यात मुंबई इंडीयन्सने दिल्लीला जिंकू दिले नव्हते. परंतु सिझन बदलला आणि विजयाची गणितं सुध्दा बदलली. या सिझनमध्ये मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची पहिली संधी दिल्लीने या सामन्यात सोडली नाही आणि एका महत्वाच्या सामन्यातून २ बोनस गुणांची कमाई केली. डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करुन सामना जिंकण्याचा मुंबईचा आजचा प्रयत्न फसला कारण, ज्या बुमरावर मुंबईची मदार आहे त्याने १९ व्या षटकात दोन नोबॉल टाकल्याने मुंबईला फारसे काही करताच आले नाही.
१३८ ही धावसंख्या गाठणे दिल्लीसाठी फार कठीण नव्हते. रिषभ पंतच्या संघात धुरंधर फलंदाज आहेत. शिखर धवन त्यातलाच एक. शिखर धवनच्या नावावर सध्या या सिझनच्या सर्वाधिक धावा (२३१ धावा) आहेत, सर्वाधिक चौकार (२९) ठोकण्याचा मान त्याच्या नावावर आहे आणि सर्वाधिक अर्धशतंक (२) त्याच्या नावावर आहेत. हे सगळ धवनने जमवलंय ते अवघ्या ४ सामन्यात. मागच्या सिझनमध्ये शिखरला शेवटच्या काही सामन्यात सुर गवसला होता. यंदा जणू हाच गवसलेला सुर शिखरने या सिझनमध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दिल्लीसाठी तो तारणहार ठरतोय. आजच्या सामन्यात त्याने ४५ धावा करतांना संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. स्टीव्ह स्मिथ, ललीत यादव आणि अखेरीस शिमरॉन हेटमायर यांनी मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढून घेतली.
पहिल्या डावात मुंबई इंडीयन्सला टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करतांना १५० धावांचा टप्पा सुध्दा गाठता आला नाही. एकटया रोहीत शर्माच्या ४४ धावांची खेळी सोडली तर मुंबई इंडीयन्सच्या कोणत्याच फलंदाजाला समाधानकारक धावसंख्या नोंदविता आली नाही. सुर्यकूमार यादव (२४ धावा), ईशान किशन (२६ धावा )आणि नव्याने संघात घेतलेला जयंत यादव (२३ धावा) या तीन फलंदाजांनी डावाला थोडाफार आकार देणारी फलंदाजी केल्याने २० षटकात ९ बाद १३७ अशी मुंबईची धावसंख्या झळकली. दिल्लीच्या अमित मिश्राने ४ तर आवेश खानने २ बळी घेवून मुंबईच्या फलंदाजीचे पंख छाटले.
बुधवार दि. २१ एप्रिल २०२१ रोजी होणारे दोन सामने –
सामना क्र.१– पंजाब किंग्ज वि.सनरायझर्स हैद्राबाद, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई
सामना क्र.२– कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज, वानखेडे स्टेडीअम, मुंबई