मनाली देवरे, नाशिक
दिल्ली कॅपीटल्सच्या गब्बरसिंगने म्हणजेच शिखर धवनने १९५ या मोठया धावसंख्येला जराही न घाबरता धडाकेबाज फलंदाजी केली आणि दिल्ली कॅपीटल्सला एक महत्वाचा विजय मिळवून दिला. डावाच्या सुरूवातीला प़थ्वी शॉ च्या ३२ धावा आणि बाद धवन बाद झाल्यानंतर मार्कस स्टायनीसच्या २३ धावा इतकाच काय तो सोपस्कार शिखर धवनने विजयासाठी बाकी ठेवला होता. पंजाब किंग्जला या पराभवाची सल चांगलीच जाणवत राहील कारण, एका चांगल्या धावसंख्येची उभारणी केल्यानंतर देखील पंजाबला दोन महत्वाचे गुण गमवावे लागले आहेत.
रविवारी खेळल्या गेलेल्या दुस–या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने टॉस जिंकला आणि पंजाबला फलंदाजी दिली. हा निर्णय दिल्लीकंराना चांगलाच चुकीचा वाटला जेव्हा पंजाबच्या १२२ धावा झाल्यानंतर दिल्लीला पहिली विकेट मिळाली. के.एल.राहूल (६१ धावा) आणि मयंक अग्रवाल (६९ धावा) या सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी तब्बल १२.४ षटकं खेळून काढतांना दिल्ली कॅपीटल्सच्या गोलंदाजाचा मुंबईच्या वानखेडे मैदानावर अक्षरश: घाम काढला. रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, ख्रिस वोक या सगळयांनी सलामीची जोडी फोडायचा भरपुर प्रयत्न केला परंतु, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. दिल्ली आणि पंजाब या दोघांनी हा सामना खेळण्यापुर्वी या सिझनमधल्या दोन सामन्यात एक विजय आणि एक पराभव अशी सारखी कामगिरी केलेली होती. आजच्या सामन्यात या बॅटलमध्ये दिल्ली कॅपीटल्सला दोन गुण मिळवून पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.
आरसीबीचा केकेआर विरूध्द विजय
आज रविवार असल्याने दोन सामने खेळविण्यात आले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सध्या वादळी खेळ करतोय. या संघाचा वारु बेभान सुटलाय. त्याला वेसन घालणं कठीण झालं आहे. पहिल्या तीनही सामन्यात या संघाला विजय मिळाला आहे. ज्या संघात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि ए.बी.डिव्हीलियर्स यांच्यासारखे फलंदाज असतील त्या संघाच्या फलंदाजीचे वर्णन काय करावेॽ आजच्या सामन्यात यांच्यापैकी फक्त ग्लेन मॅक्सवेल (७८ धावा) आणि ए.बी.डिव्हीलियर्स (नाबाद ७६ धावा) हे दोन फलंदाज चांगले खेळले तरी २० षटकात संघाच्या २०४ धावा बोर्डावर झळकल्या. अवघ्या ५ धावा करून शकलेला विराट कोहली आणखी काही काळ फलंदाजी करु शकला असता तर काय झाले असते विचार करा. आजच्या सामन्यात केकेआरचे हरभजन सिंग, पॅट कमीन्स, प्रसिध क्रिष्णा आणि वरुण चक्रवर्ती हे गोलंदाज अक्षरश: प्रेक्षक बनू राहीले. मॅक्सवेल आणि डिव्हीलियर्स यांनी खेळपट़टीवर यापैकी कुणालाही वरचढ होवू दिले नाही आणि म्हणून आरसीबीला धावांचा डोंगर उभा करता आला. कोलकाता नाईट रायडर्स साठी या धावसंख्येचा पाठलाग करणे अवघड होते. आंद्रे रसेल (३१ धावा) ही केकेआरसाठी वैयक्तीक सर्वोच्च्ा धावसंख्या होती, यात सगळे काही आले. कायले जेमीसन, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल या आरसीबीच्या गोलंदाजांनी केकेआरच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ टिकू दिले नाही आणि उभय संघातली ही फाईल केकेआरला आरसीबीच्या पारडयात सोडावी लागली.
सोमवार दि. १९ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडीअम, मुंबई