मनाली देवरे, नाशिक
……
डेथ ओव्हर्समध्ये जिंकण्याची सवय लागलेल्या आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळेला चॅम्पीअन ठरलेल्या मुंबई इंडीयन्सला पराभूत करण्याची संधी सनरायझर्स हैद्राबादने आजच्या सामन्यात गमावली. मुंबईने हा सामना १३ धावांनी जिंकला. १५० ही धावसंख्या सामना वाचविण्यासाठी मुंबईला पुरेशी नव्हती. ६७ धावसंख्या होईपावेतो सनरायझर्सचा एकही बळी गेलेला नव्हता. एकतर रोहीतने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आत्मघातकी वाटत होता. फक्त १५० धावा केल्यावर तो खरा ठरतो की काय, असे देखील वाटत होते आणि त्यानंतर सलामीची जोडी फोडायला मुंबईला ७ षटकं वाट बघावी लागली तिथे मुंबईच्या गोटात घबराट निर्माण होणे सहाजिक होते. डेव्हीड वॉर्नर (३६ धावा) आणि हीट विकेट झालेल्या जॉनी बेअरस्टो (४३ धावा) यांनी सनरायझर्स साठी विजयाचा कॅनव्हास रंगवून ठेवला होता. परंतु, त्यावर विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, रशिद खान आणि तळाच्या फलंदाजांना विजयाचे रंग भरता आलेच नाही. १३७ धावांवर हा संपुर्ण संघ बाद झाला. बोल्ट, बुमराह आणि राहूल चहर हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले;
खेळपट़टीचा व्यवहार आजच्या सामन्यात वेगळाच होता. प्रथम फलंदाजी करणा–या मुंबईसाठी ताकद असलेल्या पोलार्डचे फटके सिमापार लागतांना त्याला सुध्दा कष्ट पडत होते. अशा परिस्थीतीत आत्तापर्यन्त चालत आलेल्या परंपरेला फाटा देवून मुंबई इंडीयन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायझर्सच्या संघासमोर मोठे आव्हान ठेवून त्यांच्यावर दबाब आणण्याचा रोहीत शर्माचा प्रयत्न होता पण त्यात त्याला फारसे यश आले नव्हते. शेवटच्या २ चेंडूवर कायरन पोलार्डने (नाबाद ३५ धावा) षटकार खेचल्याने मुंबईला किमान १५० धावांचे सन्मानजनक आव्हान तरी सनरायझर्स समोर ठेवता आले. त्याआधी रोहीत शर्मा (३२ धावा) क्विंटन डी कॉक (४० धावा) या दोघांनी फलंदाजीसाठी निगेटीव्ह असलेल्या खेळपट़टीवर चांगली खिंड लढवली. रशिद खान, मुजीब–उर रहेमान, खलील अहमद आणि भुवनेश्वर कुमार यांनी आपआपला ४ षटकांचा स्पेल पुर्ण केला. परंतु, यशस्वी ठरले ते प्रत्येकी २ बळी घेणारे मुजीब–उर आणि विजय शंकर.
सनरायझर्ससाठी खेदाची बाब म्हणजे, हा पराभव त्यांच्यासाठी सलग तिसरा पराभव ठरला. स्पर्धेच्या सुरुवातीलाच या संघाची ही ढिसाळ कामगिरी संघासाठी योग्य नाही. मुंबईसाठी महत्वाची बाब म्हणजे या संघाने मिळविलेली दोन्ही विजय हे सफाईदारपणे आणि अतिशय चाणाक्ष रितीने मिळविलेले विजय असल्याने या संघाचे मनोर्धेर्य यानंतर वाढलेले बघायला मिळणार आहे.
रविवार दि. १८ एप्रिल २०२१ रोजी होणारे दोन सामने –
पहिला सामना (वेळ दुपारी ३.३० वाजता) – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई.
दुसरा सामना (वेळ दुपारी ७.३० वाजता) – दिल्ली कॅपीटल्स वि. पंजाब किंग्ज, वानखेडे स्टेडीअम, मुंबई.