मनाली देवरे, नाशिक
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्ज विरूध्दचा एक सोपा सामना ६ विकेटसने सहजपणे जिंकून या सिझनमधला आपला पहिला विजय नोंदविला. चेन्नईचा सलामीवीर ऋतूराज गायकवाडचा पहिला बळी पंजाबला लवकर मिळाला होता. परंतु, त्यानंतर डुप्लेसीस (नाबाद ३६ धावा) आणि मोईन अली (४६ धावा) यांनी एक भक्कम भागिदारी रचुन विजयासाठी आवश्यक असलेल्या धावसंख्येपर्यन्त आपल्या संघाला नेवून ठेवले. १०७ धावा करण्याचे सोप्पे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या चेन्नईने अवघे ४ बळी गमावून १६ व्या षटकातच हा सामना संपवला. या विजयानंतर चेन्नईला महत्वाचे २ गुण तर मिळाले आहेतच परंतु, एकूण ४.२ षटकांचा खेळ बाकी असतांना त्यांनी हा विजय मिळविलेला असल्याने या संघाचा नेट रनरेट देखील भक्कम होणार आहे.
के.एल.राहूल, दिपक हुडा, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन….. फलंदाजांची ही इतकी मोठी फौज पंजाब किंग्ज संघात आहे. परंतु, या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करतांना ती सपशेल अपयशी ठरली आणि २० षटकात ५.३० च्या सरासरीने पंजाबला फक्त १०६ करता आल्या. मुळचा तामीळनाडुचा आणि २०२१ च्या मुश्ताक अली चषक स्पर्धेत चमकलेला शाहरुख खान नावाचा नवखा फलंदाज या संघाच्या मदतीला धावून आला आणि त्याने केलेल्या ४७ धावा पंजाबसाठी सर्वाधीक वैयक्तीक धावा ठरल्या. २०२१ च्या आयपीएलमध्ये गोलदाजांचा वरचष्मा दिसून येतो आहे. या सामन्यात दिपक चहरने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या १३ धावा देवून ४ बळी घेतले. पंजाबचे सगळेच मुख्य फलंदाज त्याची शिकार ठरले हे विशेष.
महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात टॉस जिंकला आणि पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी दिली. पंजाबने पहिल्या साखळी सामन्यात सुंदर कामगिरी केली होती. परतु, या सामन्यात पंजाबचा खेळ दर्जेदार झालाच नाही आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला त्याचा फायदा झाला. गतवर्षीच्या सिझनमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करणा–या चेन्नईसाठी हा विजय महत्वाचा ठरणार आहे.
शनिवार दि. १७ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
मुंबई इंडीयन्स वि. सनरायझर्स हैद्राबाद, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई