मनाली देवरे, नाशिक
आयपीएल २०२१ च्या साखळीमध्ये अखेरीस एकतर्फी मार्गावर निघालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यु टर्न घेतला आणि दिल्ली कॅपीटल्सवर ३ गडी राखून विजय संपादन केला. १४९ या छोटया धावसंख्येचा पाठलाग सुध्दा राजस्थान रॉयल्ससाठी अवघड वाटत होता. ९० धांवावर या संघाचे ६ फलंदाज बाद झाले होते. परतु, क्रिस मॉरीसने आज फलंदाजीत धमाल केली. अखेरच्या २ षटकात उंचपु–या मॉरीसने १८ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या आणि दिल्लीच्या आवाक्यात गेलेला विजय खेचून आणला. कागिसो रबाडा सारखा गोलंदाज सुध्दा मॉरीसच्या तडाख्यातून सुटला नाही. त्याआधी डेव्हीड मिलरने ६२ धावा करून राजस्थान रॉयल संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. या विजयाने राजस्थानसाठी २ गुणांनी या सिझनचे खाते उघडले गेले आहे.
दिल्ली कॅपीटल्स म्हणजे फलंदाजीचा हिमालय. पथ्वी शॅा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि मार्क स्टॉयनीस यांच्यापर्यन्त नामवंत आणि फॉर्मात असलेल्या नामवंतांची फळी राजस्थान रॉयल्ससमोर प्रथम फलंदाजी करतांना अपयशी ठरली आणि एकटया रिषभ पंत (५१ धावा) च्या अर्धशतकी खेळीच्या आधारावर दिल्लीला फक्त ८ बाद १४८ धावांपर्यन्त मजला मारता आली. राजस्थान रॉयल्सच्या जयदेव उनाडकटच्या ४ षटकात ३ बळी महत्वपूर्ण बळी घेतले. विशेष म्हणजे या २४ चेंडूपैकी १५ चेंडूवर त्याने दिल्लीकरांना एकही धाव दिली नाही.
विवो आयपीएल २०२१ च्या साखळीत आता रंग भरु लागले आहेत. गुणांच्या टेबलमध्ये पहिल्या चार क्रमांकावर रहाण्यासाठीची प्रत्येक संघाची धडपड आता जाणवायला लागली आहे. नंतर धावपळ करण्यापेक्षा पूर्वार्धातच गुणांची कमाई करून टॉप ४ मध्ये आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न मागच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने जसा केला होता, तसाच या वर्षी देखील करण्याचा त्यांचा मनसुबा असणार आहे. तिकडे राजस्थान रॉयल्सला माञ आता काहीतरी अफलातून अशी कामगिरी करावीच लागणार आहे. मागच्या वर्षी अंतीम निकाल आला त्यावेळी गुणांच्या तक्त्यात सगळयात तळाला हा संघ होता. जिंकण्यासाठी संजु सॅमसनच्या कर्णधारपदाखाली खेळणारा हा संघ लढतोय पण यश मिळत नाही असे किमान यावर्षी तरी होवू नये अशी राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांची या विजयानंतर अपेक्षा राहील. शेवटी मोजला जातो तो विजय आणि त्यातून मिळणारे देान गुण. दोन हात करतांना संघ कितीही चांगला खेळला परंतु, जिंकू शकला नाही तर काहीच फायदा होत नाही, याची जाणीव या संघाला या विजयानंतर झाली असेल तर ती कायम रहाते की नाही हेच आता बघावे लागेल.
शुक्रवार दि. १६ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
पंजाब किंग्ज वि. चेन्नई सुपर किंग्ज, वानखेडे स्टेडीअम, मुंबई