मनाली देवरे, नाशिक
विजयासाठी अवघ्या १५० धावा करण्याचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या सनरायजर्सला आज विजयाचे खाते खोलण्याची संधी होती. डेव्हीड वॉर्नर (५४ धावा) आणि मनिष पांडे (३८ धावा) यांनी विजयाचा पाया देखील रचला होता. परंतु, नंतर जणु काही खुप मोठया धावसंख्येचा आपण पाठलाग करीत आहोत अशा अविर्भावात उरलेल्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्या आणि सनरायझर्सच्या विजयाची संधी आयपीएल २०२१ च्या सिझनमध्ये लागोपाठ दुस–यांदा हुकली. सनरायझर्सकडे गुणवत्ता आहे परंतु विजयासाठी लागणारे रसायन नाही असे नेहमीच म्हटले जाते. या सामन्यात त्याचाच प्रत्यय आला आणि अनुभवी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर संघाने लागोपाठ दुसरा विजय मिळवून या सिझनमध्ये आपला नवा अवतार समोर आणला आहे.
सनरायझर्स संघाने टॉस जिंकून या सामन्यात आरसीबीला फलंदाजी दिली. मागच्या सिझन प्रमाणेच या सिझनमध्ये सुध्दा टॉस जिंकल्यानंतर हा निर्णय विजयासाठी फायदेशीर ठरतो आहे. डेव्हीड वॉर्नरच्या या निर्णयाला सनरायझर्सच्या गोलंदाजांनी चांगला न्याय दिला. विराट कोहलीने सुरूवात भक्कम करायची, मॅक्सवेलने मधल्या फळीत एका बाजुने प्रहार सुरू करायचा आणि शेवटच्या काही षटकात मैदानावर येवून ए.बी.डिव्हीलियरने धावा अक्षरश: कुटून काढायच्या ही आरसीबीची ठरलेली कुटनीती या सामन्यात थोडीशी बिघडवून ठेवण्यात सनरायझर्सचे गोलंदाज यशस्वी ठरले. विराटने (३३ धावा) त्याची जबाबदारी पुर्ण केली. मॅक्सवेलने (५९ धावा) देखील त्याची जबाबदारी पुर्ण केली. परंतु, अपयशी ठरला तो डिव्हीलियर. रशिद खानच्या एका फसव्या चेंडूवर तो बाद झाला आणि आरसीबीला शेवटी एक मोठी आणि मजबुत धावसंख्या उभारणे शक्य झाले नाही. २० षटकात अवघ्या १४९ धावा ही आरसीबी साठी फार मोठी कामगिरी नव्हती. रशिद खान नावाचा हिरा सनरायझर्स संघात आहे. त्याने ४ षटकात अवघ्या १८ धावा देवून डिव्हीलियर आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन महत्वपुर्ण बळी अगदी महत्वाच्या वेळी घेतले. भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर आणि टी.नटराजन यांनी देखील सुरेख गोलंदाजी केली.
सनरायझर्स, हैद्राबाद संघाला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. कारण, चॅम्पीअनशीपचा दावेदार म्हणून स्वत:ला शाबीत करायचे असेल तर कुठेतरी विजयाची सुरुवात करावीच लागते. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सने मुंबईला पहिल्याच सामन्यात मात देवून संघाचा आत्मविश्वास हिमालयावर नेवून ठेवलेला असल्याने सहाजिकच विराट कोहलीचे नेत़त्व आता मागे वळून बघणार नाही अशी खाञी संघ चाहत्यांना वाटत होती.
गुरुवार दि. १५ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपीटल्स्, वानखेडे स्टेडीअम, मुंबई