मनाली देवरे, नाशिक
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडीयन्सने आयपीएल २०२१ च्या साखळीत कोलकाता नाईट रायडर्सवर १० धावांनी विजय मिळवून जोरदार कमबॅक केले आहे. टी २० मध्ये शेवटच्या चेंडूपर्यन्त डाव सोडायचा नसतो याचीच शिकवण या सामन्यात रोहीत शर्माच्या चॅम्पीअन मुंबई इंडीयन्सने सगळयांना दिली.
प्रथम फलंदाजी करणा–या मुंबई इंडीयन्सचा डाव अवघ्या १५३ धावात आटोपला आणि जणुकाही तिथेच केकेआरसाठी या सामन्यात विजयाचे अर्धेअधिक दार उघडले गेले होते. रोहीत शर्माने ३२ चेंडूत ४३ धावा केल्या आणि नेहमीप्रमाणे सुर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ५६ धावा करतांना मुंबईसाठी महत्वाची कामगिरी केली इतक्याच काय त्या या डावातल्या ठळक गोष्टी. बाकी दोन्ही पांडया बंधूचे १५ धावांवर बाद होणे, इशान किशन किंवा कायरन पोलॉर्ड यापैकी एकाने का होईना, खेळपट़टीवर चमत्कार न दाखविणे हे मुंबईसाठी जणू पराभवाची बाराखडी लिहीण्यासारखे होते. शेवटच्या ५ षटकात मुंबई इंडीयन्सच्या फलंदाजीचे झालेले हाल, आयपीएलच्या इतिहासात फार कमी वेळा बघायला मिळालेले आहेत.
केकेआरच्या नितीश राणा आणि शुभमन गिल या सलामीच्या फलंदाजांचा खेळ पहाता मुंबईकर गोलंदाजांच्या हातात सामना वाचविण्यासाठी फार काही उरले नव्हते आणि म्हणूनच १०९ धावसंख्या असतांना त्यांचे अवघे ३ फलंदाज बाद झाले होते त्यावेळी रोहीत शर्माने स्वत: एक षटकं टाकून बघितले. परंतु राहुल चहरने ‘कहानी मे व्टिस्ट’ आणावा तसा एक चांगला स्पेल टाकला आणि शुभमन गिल, राहुल ञीपाठी, इॅऑन मारगन आणि शाकीब उल हसन हे चार बळी घेत हातातून गेलेला सामना मुंबई इंडीयन्ससाठी परत आणला. जी कामगिरी रसेलने केकेआरसाठी केली होती जवळजवळ तशीच कामगिरी मुंबईसाठी चहलने केली परंतु, फरक इतकाच की चहरची खेळी विजयासाठी मदतीची ठरली आणि रसेलचा स्पेल एक विक्रम म्हणून नोंदविला गेला. केकेआरचे ५ फलंदाज परतल्यानंतर आवश्यक धावगती वाढत गेली. इतक्या चेडूंत इतक्या धावा, हे समीकरण वाढत गेले आणि शेवटच्या षटकात १५ धावा करण्याचे मोठे आव्हान केकेआरच्या अनुभवी दिनेश कार्तीक आणि आ्रद्रे रसेल यांना पेलताच आले नाही आणि संघाचा पराभव झाला. मुंबईने हा सामना अक्षरश: खेचून आणला असेच म्हणणे जास्त समर्पक होईल.
आंद्रे रसेल हा मुळचा वेस्टइडींजचा जमैकन खेळाडू. ३२ वर्षाच्या क्रिकेटमध्ये फास्ट बोलरसाठी जे किलर इन्स्टींक्ट असावे लागते ते परपंरेप्रमाणे रसेलमध्ये खच्चून भरले आहेत. पुर्वी वेस्टइंडीजचे तुफान वेगवान गोलंदाज फक्त गोलंदाजी करायचे. त्यांच्यात अष्टपैलूत्व फार कमी होतं. परंतु, काळाची पावले ओळखून तिथे तयार झालेल्या काही मोजक्या अष्टपैंलू पैकी एक म्हणजे आंद्रे रसेल. रसेलने आज अवघ्या २ षटकात १५ धावा देवून ५ बळी घेतांना केकेआरसाठी पहिल्याच सामन्यात पैसा वसूल करून दिला. न भुतो न भविष्यती अशी ही कामगिरी म्हणावी लागेल. २०१४ साली केकेआर सोबत करण्याअगोदर या गोलंदाजाने भारत ‘अ’ संघाविरूध्द ४ चेडूंत ४ बळी घेतले होते व टी२० इतिहासात असा पराक्रम फक्त एकदाच घडलाय. आजचा दिवस आंद्रे रसेलसाठी खरोखर लकी दिवस होता. गोलदांजी करतांना ५ बळी आणि फलंदाजीला आल्यावर लागोपाठच्या दोन षटकात त्याचे सुटलेले झेल. रसेलसाठी हा सामना कायम स्मरणात राहील.
मुंबई इंडीयन्स आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने या संघावर दडपण असणे सहाजिक होते. या संघाची खरी ताकद आहे ती फलंदाजी आणि म्हणूनच दुस–या डावात धावसंख्येचा पाठलाग करण्याची संधी रोहीत शर्मा शोधत असावा. परंतु, नाणेफेकीचा कौल या सामन्यात सुध्दा त्याच्या विरुध्द गेला आणि त्यानंतरची त्याची देहबोली मुंबई इंडीयन्सचा प्लॅन ‘अ’ अपयशी ठरतो की कायॽ हेच दर्शविणारी होती. याउलट, सनरायझर्स विरूध्द जिकूंन एक घर पुढे आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा आत्मविश्वास या सामन्यात मुंबई इंडीयन्सपेक्षा उजवा होता.
बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
सनरायझर्स हैद्राबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई