मनाली देवरे, नाशिक.
एका मोठया सामन्यात, मोठी धावसंख्या गाठण्याचे, मोठे कसब पुर्ण करुन मुंबई इंडीयन्सने आयपीएल २०२१ च्या गुणतक्त्यात टॉपवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. या विजयानंतर मुंबईची थांबलेली विजयी घोडदौड पुन्हा एकदा केवळ सुरु होणार नाही तर पुन्हा एकदा विजेतेपदाच्या दिशेने त्यांचा दावा प्रबळपणे मांडला जाईल असे मत तज्ञ खेळाडूंनी व्यक्त केले आहे. सामना वाचवता येईल यासाठी धोनीने शर्थीचे प्रयत्न केले परंतु, त्याला यश मिळाले नाही.
मुंबईसाठी सुपरस्टार ठरला तो कायरन पोलार्ड. २१८ ही धावसंख्या मुंबई इंडीयन्सने याआधी कधीही चेस केलेली नाही. अंबाती रायडूने चेन्नईसाठी मोकळे हात सोडून फलंदाजी केल्याने ही मोठी धावसंख्या फलकावर झळकली होती. परतु पोलार्डने त्याचे हात मोकळे सोडतांना जबाबदारी दाखवली, ताकदीचा उपयोग केला आणि सगळा अनुभव पणाला लावून अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावा केल्या…… त्यात ६ चौकार ८ षटकार आणि जवळपास २२० धावांची सरासरी राखून पोलार्डने इतिहास घडवला.
मुंबई इंडीयन्सला विजय महत्वाचाच होता कारण चेन्नईने अगोदरच १० गुण जमवून आपले पाय साखळीमध्ये पक्के केलेले आहेत. त्या तुलनेत मुंबईचे अवघे ६ गुण झालेले असल्याने मुंबईला या एका मोठया सामन्यातून २ गुणांची कमाई करण्याची नितांत आवश्यकता होती. २१८ धावांचा पाठलाग करणे ही काही साधी बाब नव्हती. टी२० मध्ये १९० ते २०० धावांचे आव्हान हे मोठे आव्हान समजले जाते. चेन्नईने त्यापुढे जावून २१८ धावांचे एक मोठे आव्हान दिलेले असल्याने मुंबईकडून कोणीतरी कारकिर्दीची एक मोठी खेळी करणे आवश्यक होते. पोलार्डने तेच केले आणि मुंबईला एक जबरदस्त विजय मिळाला.
सीएसकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना पुर्ण जीव ओतला होता. मुंबई इंडीयन्सची फलंदाजी मजबुत असल्याने या संघाला देता येईल तितके जास्त मोठे आव्हान देण्याचा इरादा ठेवूनच चेन्नई सुपर किंग्ज मैदानात उतरला होता. चेन्नईने १२० चेंडूत २१८ धावांचे तगडे आव्हान मुंबईला दिले. फाफ डुप्लेसीस (५० धावा) मोईन अली (५८ धावा) आणि अंबाती रायडू नाबाद ७२ धावा बरोबरच रविंद्र जाडेजाच्या नाबाद २२ धावा, या ४ फलंदाजांचा यात मोठा वाटा होता. अंबाती रायडूने आज कमाल केली. मुंबईचा सर्वात महत्वाचा गोलंदाज बुमरासह सगळयांचीच आज धुलाई झाली. डुप्लेसीस आणि मोईन अली या दोघांनी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करुन ठेवलेला असल्याने फलंदाजी करतांना रायडूने अक्षरश: धडाका लावला. अवघ्या ४ या धावसंख्येवर चेन्नईचा पहिला फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर ११२ ते ११६ या धावसंख्येवर पुढच्या ४ विकेटस पडल्या. मुंबईची पकड सामन्यावर येईल असे वाटत असतांना पुढे आणखी १०० धावा होईपावेतो एकही विकेट पडली नाही.
रविवार दि. २ मे २०२१ रोजी होणार दोन सामने –
१. राजस्थान रॉयल्स वि.सनरायझर्स हैद्राबाद, दिल्ली
२. पंजाब किंग्ज वि; दिल्ली कॅपीटल्सकॅपीटल्स, अहमदाबाद