मनाली देवरे, नाशिक
गुरुवारी आयपीएलच्या साखळीत दोन सामने खेळले गेले. या दोन सामन्यात मुंबई इंडीयन्स आणि दिल्ली कॅपीटल्स या दोन्ही संघानी आपआपले विजय नोंदवून प्ले ऑफच्या दिशेने आपली पकड आणि मजबुत केली.
दिल्ली कॅपीटल्सचा केकेआरवर धडाकेबाज विजय
दुस–या सञामध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकात अवघ्या १५४ धावा केल्या. दिल्लीसाठी हे आव्हान फार कठीण नव्हते आणि प़थ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनीच ते पुर्ण करुन केकेआरला एक मोठा पराभव दिला.
या पराभवानंतर केकेआरची या सिझनमधली परिस्थीती आणखी बिकट होणार असून त्यांची ६ सामन्यात फक्त ४ गुणांची कमाई झाल्याने पुढे प्ले ऑफची फेरी गाठण्यासाठी केकेआरला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. या सामन्यात १५४ धावा करतांना केकेआरचे ६ फलंदाज बाद झाले परंतु, चांगला खेळ केला तो फक्त आंद्रे रसेल आणि शुभमन गिल या दोघांनीच. परंतु केकेआरच्या एकाही गोलंदाजाला या सामन्यात सुर गवसला नाही आणि मग दिल्लीला १७ व्या षटकाच्या सुरुवातीलाच एक मोठा विजय, त्यातून दोन महत्वाचे गुण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक मजबुत रनरेट असा तिहेरी फायदा मिळवून दिला.
मुंबई इंडीयन्सने मारली बाजी
दुपारच्या सञामध्ये दिल्लीत झालेला राजस्थान रॉयल्स विरुध्दचा सामना मुंबई इंडीयन्सने ७ धावांनी जिंकला आणि या सिझनमधली ६ सामन्यात ६ गुण अशी जेमतेम कामगिरी गाठली.
मुंबईचा यष्टीरक्षक आणि सलामीचा खेळाडू क्विंटन डिकॉक याच्या धावा होत नव्हत्या. या सामन्याआधी तो या सिझनमध्ये ४ आयपीएल साखळी सामने खेळला होता आणि त्याच्या अवघ्या ४७ धावा झाल्या होत्या. या सामन्यात डीकॉकने नाबाद ७० धावा केल्या. या सामन्यात रोहीत शर्मा आणि सुर्यकुमार यादव हे नेहमीचे यशस्वी होणारे चेहरे फारसे झळकले नाहीत माञ त्यांच्या एैवजी डीकॉक, कुणाल पांडया यांनी जबाबदारीने खेळ केला आणि राजस्थान रॉयल्सच्या १७१ धावांचे आव्हान १८.३ षटकात पुर्ण करुन संघाला एक महत्वाचा विजय मिळवून दिला. त्याआधी राजस्थान रॉयल्सने २० षटकात ४ गडयांच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या होत्या. जॉस बटलर, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि संजु सॅमसन या चारही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली परंतु यापैकी एकाने जरी १८० ते २०० च्या सरासरीने धावा केल्या असत्या तर कदाचित १९० च्या आसपास धावा जमवून मुंबईला अडचणीत आणणे राजस्थानने सोप्पे गेले असते. परंतु, मुंबईच्या बुमराची ४ षटकं राजस्थानला भलतीच महागात पडली. त्याने टाकलेल्या २४ चेंडूंपैकी १२ चेंडूंवर राजस्थानच्या फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही हे विशेष.
या सामन्यात मुंबईचा कायरन पोलार्ड फलंदाजीसाठी मैदानात आला त्यावेळी एक मजेशीर घटना घडली. पोलार्ड हा ताकदवान खेळाडू आहे आणि त्याने मारलेले चेंडू ताकदीच्या मदतीने नेहमीच अनपेक्षीतरित्या सीमारेषेच्या पलिकडे जात असतात हे सगळयांनाचा माहिती आहे. परंतु, या सामन्यात ख्रिस मॉरीसचा एक बाउन्सर त्याच्या हेल्मेटला लागून सीमारेषेबाहेर गेलेला बघायला मिळाला आणि पोलार्डच्या पोलादी ताकदीचा आणखी एक अनोखा अंदाज मजेशीर ठरला.
कोणत्याही खेळाचा एक नियम आहे, तुमचा प्रतिस्पर्धी जर मजबुत असेल तर जिंकण्याची जिद़द ठेवावी लागते आणि जर तुमचा प्रतिस्पर्धी कमकुवत असेल तर जिंकण्यासाठीच खेळा अशी तयारी ठेवावी लागते. मागच्या दोन सामन्यात पराभुत झालेल्या मुंबई इंडीयन्ससाठी राजस्थान रॉयल्सविरुध्दचा सामना जिंकण्यासाठीच खेळायचा होता आणि ती संधी मुंबई इंडीयन्सने सोडली नाही. मुंबईचे दिवस सध्या वाईट आहेत. ६ सामन्यात ३ पराभव आणि ३ विजय ही आकडेवारी मुंबई इंडीयन्सच्या नावासमोर शोभून दिसत नसली तरी ते सत्य आहे. आता या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सविरूध्दच्या विजयानंतर माञ मुंबई इंडीयन्सच्या कामगिरीत बदल बघायला मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे. येत्या १ मे रोजी मुंबईचा मुकाबला चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. हा महा मुकाबला मुंबईने जिंकला तर निश्चीतच साखळी सामन्याच्या पहिल्या टप्याअखेर मुंबईसाठी हा विजय महत्वाचा ठरेल.
शुक्रवार दि. ३० एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
पंजाब किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, नरेंद्र मोदी स्टेडीअम, अहमदाबाद