मनाली देवरे, नाशिक.
आयपीएलच्या २३ व्या साखळी सामन्यात धोनीच्या धुरंधर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैद्राबादचा ७ गडी राखून पराभव केला आणि पुन्हा एकदा नंबर वन स्थानावर झेप घेतली.
आजच्या सामन्यात सनरायझर्ससाठी डेव्हीड वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिल्या डावात फलंदाजी निवडली. वॉर्नरच्या संघात चांगले गोलंदाज नाहीत याची त्याला जाणिव आहे आणि त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारुन चेन्नईला अडचणीत आणण्याचा वॉर्नरचा प्लॅन असावा. परंतु हा प्लॅन पुर्णपणे यशस्वी झाला नाही. १७१ धावांचा मोठा डाव सनरायझर्सने रचला परंतु चेन्नईसमोर आणखी ३० धावा कमी पडल्या असे म्हणायला हरकत नाही. डेव्हीड वॉर्नरच्या ५७ धावा आणि मनिष पांडेने त्याला दिलेली ६१ धावांची मजबुत साथ यामुळे संघ सुस्थिथीत आला होता. केन विलीयम्सनने डावाच्या शेवटी फलंदाजीला येवून १० चेडूंत २६ धावा आणि केदार जाधवने ४ चेडूंत १२ धावा काढून डावाला एक कडक फोडणी दिली होती. परंतु, चेन्नई संघ फॉर्मात असतो तेव्हा विजयासाठी असलेली रेसीपी धोनी सामन्याआधीच तयार करुन ठेवत असतो. या सामन्यात देखील कुठलाही दबाब व ठेवता चेन्नईच्या सलामीविरांनी १२९ धावांची सलामी दिली आणि तिथेच सामन्याची सगळी सुञ आपल्या ताब्यात घेवून टाकली. ॠतुराज गायकवाड [७५ धावा] आणि फाफ डुप्लेसीस [५६ धावा] या दोघांनी संपुर्ण संघाचा भार स्वत:वर घेवून चेन्नईसाठी विजयाचा प्लॅटफॉर्म तयार करुन ठेवला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेले सोपस्कार रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैनाने पुर्ण केले. १४८ या धावसंख्येवर रशिद खानने चेन्नईचे २ बळी घेवून सामन्यात थोडी हवा भरली होती, परंतु ती क्षणैक ठरली आणि १९ व्या षटकात चेन्नईने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
मुंबई इंडीयन्सनंतर आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ नेहमीच ऑल टाईम फेव्हरीट संघ म्हणून ओळखला जातो. परंतु, दुबई आणि अबुधाबीत मागच्या वर्षीच्या एपिसोडमध्ये या संघाला अपयश मिळाल्यानंतर या वर्षी या संघाच्या गुणवत्तेवर सुरुवातीला काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. चेन्नईने आत्तापर्यन्तच्या ६ साखळी सामन्यात माञ जबदरस्त कमबॅक केले असून मागचे वर्ष “अपवाद” होता, आमच्यातली गुणवत्ता कायम आहे हेच सिध्द केले आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघाविरूध्दचा सामना जिंकून गुणतालिकेत पहिला नंबर पटकावतांना चेन्नईने ६ सामन्यात ५ विजयाच्या मदतीने १० गुणांची कमाई केली आहे. इथून पुढे साखळीतून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या संघाला आता फारशा अडचणी येणार नाहीत अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. याउलट परिस्थीती आहे ती सनरायझर्स हैद्राबादची. हा संघ गुणतालिकेत तळाला होता आणि या सामन्यानंतरही तळालाच राहीला कारण चेन्नईच्या अगदी विरूध्द म्हणजे या संघाचा ६ सामन्यात हा पाचवा पराभव होता. आता पुढे, गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर पोहोचणा–यांची संख्या आणि स्पर्धा वाढणार असल्याने सनरायझर्स साठी अतिशय खडतर प्रवास शिल्लक राहीला आहे.
डेव्हीड वॉर्नर या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला परंतु, या वैयक्तीक विक्रमाखेरीज या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादसाठी काहीही चांगलं घडलं नाही.
गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ रोजी होणारे दोन सामने –
सामना क्र. १ – मुंबई इंडीयन्स वि. राजस्थान रॉयल्स, अरुण जेटली स्टेडीअम, दिल्ली
सामना क्र.२ – दिल्ली कॅपीटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, नरेंद्र मोदी स्टेडीअम, अहमदाबाद