मनाली देवरे, नाशिक
अटीतटीच्या साखळी सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने दिल्ली कॅपीटल्सचा अवघ्या एक धावेने पराभव करुन आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना अटीतटीचा ठरला परंतु, अखेर बाजी मारली ती आरसीबीनेच.
दिल्लीचे फलंदाज १७२ धावांचे टारगेट घेवून मैदानात उतरले तेव्हा सगळया नजरा शिखर धवनवर होत्या. पुथ्वी शॅा चांगला खेळतो परतु, टवेन्टी टवेन्टी मध्ये आवश्यक असलेली चांगली धावगती राखतो तो शिखर. उंचापु–या जेमिसनचा तो शिकार ठरला तेव्हाच दिल्लीच्या हातातून सामना निसटला. रिषभ पंत (५४) आणि शिमरन हेटमायर (५३) यांनी नाबाद राहून मॅच ओढून आणायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा हा प्रयत्न एका धावेने कमी पडला.
या सामन्यात पहिल्या डावात आरसीबी फलंदाजी करीत असतांना दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने मार्कस स्टॉयनीसच्या हातात शेवटचे षटक देण्याची चुक केली आणि तिथेच सगळया सामन्याची दिशा बदलली. इशांत शर्मा, कागीसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांनी तुलनेने किफायतशीर गोलंदाजी केली होती परंतु स्टॉयनीसच्या शेवटच्या षटकात एबीडीने २३ धावा कुटल्या. एबीडीने स्टॉयनीसला या षटकात ३ षटकार खेचले. अमीत मिश्राच्या कोटयातले एक षटक टाकायचे शिल्लक असतांना देखील दिल्लीच्या कर्णधाराने स्टॉयनीसच्या हातात चेंडू देण्याची चुक का केलीॽ हे न उलगडणारे कोडे आहे.
मागच्या सामन्यातला पराभव आरसीबीच्या जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे. विराट कोहलीच्या चेह–यावरचे भाव या पराभवानंतर बोलके होते. त्या सामन्यात केलेल्या चुका परत होणार नाहीत याची काळजी घेत आरबीसी मैदानात उतरला. नवदीप सैनी आणि ख्रिस्तीयन या दोघांच्या एैवजी त्यांनी रजत पाटीदार आणि डॅनीएल सॅम या दोघांना मैदानात आणलं. विराट आणि मॅक्सवेल दिल्लीसाठी या सामन्यात फारसे घातक ठरले नाहीत. परंतु हे काम पुर्ण केले ते ए.बी.डिव्हीलीयर्सने. जेव्हा एबीडी खेळतो तेव्हा “धावफलक” राजधानी एक्सप्रेस सारखा पळत असतो. मध्यप्रदेशचा रजत पाटीदार आरसीबीने या सिझनमध्ये प्रथमच आपल्या संघात घेतला. त्याने आज निवड सार्थ केली. २ षटकांराच्या मदतीने २२ चेडूंत ३१ धावा करतांना संघाची पडझड थांबवली आणि त्यानंतर एबीडीने संधीचा फायदा घेत ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची घणाघाती फलंदाजी केली. १८ वे षटक संपले तेव्हा आरसीबीची धावसंख्या होती ५ बाद १३९ आणि २० व्या षटकाअखेर हीच धावसंख्या होती ५ बाद १७१. एबीडी कारनामा म्हणतात तो यालाच. दिल्लीची अडचण अशी होती की त्यांचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विन या सामन्यात संघात नव्हता. त्याच्या कुटूंबिंयाना कोवीड झाल्याने त्याने आयपीएलमधून तात्पुरती माघार घेतली आहे.
बुधवार दि. २८ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
चेन्नई सुपरकिंग्ज वि सनरायझर्स हैद्राबाद, अरुण जेटली स्टेडीअम, दिल्ली