नवी दिल्ली – २०२१च्या आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयची पहिली पसंती भारतच आहे. पण कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता ही संधी दुबईला मिळू शकते. आयपीएलच्या १२ व्या सीझनच्या यशस्वी आयोजनाचा अनुभव दुबईच्या पाठीशी आहे.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सोमवारी आयपीएल गव्हर्निंग बॉडीची व्हर्च्युअल मिटिंग झाली. या बैठकीनंतर ट्रेडिंग विंडो ओपन करण्यात आली असून २१ जानेवारीपर्यंत आपापले खेळाडू रिलीज करण्यास क्रिकेट संघांना सांगण्यात आले आहे. आयपीएलच्या या १३ व्या सीझनसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मिनी ऑक्शन आयोजित केले जाऊ शकते.
आयपीएलचे आयोजन कुठे करावे, यासाठी बीसीसीआय फ्रांचायजीजशी बोलणार आहे. पण कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती पाहता दुबईलाच पसंती मिळण्याची शक्यता आहे.
वास्तविक, यंदाचे आयपीएल भारतातच आयोजित करण्याची बीसीसीआयची इच्छा आहे. पण सैय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचे आयोजन कशाप्रकारे होते, यावर हे अवलंबून आहे.
१० जानेवारीपासून सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू, बडोदा, इंदोर आणि चेन्नई येथे हे सामने खेळवले जातील. अनेक बडे खेळाडू यात सहभागी होणार असून या कामगिरीवर त्यांना आयपीएलसाठी संधी मिळू शकते.