मनाली देवरे, नाशिक
…..
आयपीएल २०२१ या सिझनच्या दुस–या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ७ गडी राखुन दणदणीत पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी होता चेन्नईचा कर्णधार आणि त्याचा शिष्य वषभ पंत हा दिल्लीचा कर्णधार होता. परंतु, या लढाईत बाजी मारली ती धोनीच्या शिष्याने.
विजयासाठी असलेले १८९ धावांचे टार्गेट समोर घेवून उतरलेल्या दिल्ली कॅपीटल्सचे सलामीवीर पृथ्वी शॅाच्या ७२ धावा आणि शिख्रर धवनच्या घणाघाती ८५ धावा या दोघांनीच दिल्लीसाठी विजयाचा पाया रचून ठेवला आणि नंतच वुषभ पंत आणि मार्क स्टॉयनीस यांनी फक्त सोपस्कार पुर्ण करून एका महत्वाचा विजयाने या सिझनमधली आपली मोहीम सुरू केली आहे.
टी – २० चा सामना जिंकायचा असेल तर तुमच्या संघात जसे शेवटच्या क्रमांकापर्यन्त फलंदाजी करणारे फलंदाज असावे लागतात तसेच किमान एक किंवा दोन असे गोलंदाज असे असावे लागतात जे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीवर अंकुश ठेवतील आणि विकेटस सुध्दा घेतील. चेन्नई संघाकडे चांगले फलंदाज तर होते मात्र, चांगल्या गोलंदाजाची त्यांच्याकडे कमतरता असल्याने चेन्नईला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारुन देखील विजय मिळविता आला नाही. दिल्लीच्या फलंदाजीसमोर चेन्नईची गोलंदाजी अतिशय कमकुवत ठरली. दिपक चहर, सॅम करन, शार्दुल ठाकूर, जाडेजा आणि डिऑन ब्राव्हो यांच्यापैकी कुणालाही दिल्लीच्या फलंदाजीवर प्रभाव टाकता आला नाही आणि पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.
दिल्ली कॅपीटल्सने टॉस जिंकून चेन्नईकडे प्रथम फलंदाजी सोपवली होती. चेन्न्ाई मोठे टारगेट ठेवणार का ? अशी सर्वप्रथम शंका होती. सलामीची जोडी कमी धावसंख्येवर परतल्यानंतर ही शंका आणखीनच वाढली. परंतु, गेली अनेक महिने या ना त्या कारणास्तव मैदानाबाहेर राहीलेल्या आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणा–या सुरेश रैना फलंदाजीची सुत्र हातात घेतली आणि चेन्नईच्या डावाला आकार आला. एका मोठया खेळीची कधीपासून वाट बघत बसलेल्या सुरेश रैनाच्या ५४ धावा आणि त्याला मोईन अली (३६), रविंद्र जाडेजा (नाबाद २६) आणि सॅम करन (१५ चेंडूत ३४) यांची मिळालेली साथ, यामुळे चेन्नईने १८९ धावांचे तगडे आव्हान दिल्लीला दिले. महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई संघाचे फॅन्स यांचे नाते वेगळे आहे. केवळ धोनीमुळे या संघाकडे आपला संघ म्हणून बघणा–यांची संख्या लाखात मोजावी लागेल. मात्र आज धोनी शुन्यावर बाद झाला आणि चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली.
आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडीअमवर या सिझनचा हा दुसरा सामना खेळला गेला. चेन्नई मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमधला सर्वाधिक अपयशी संघ ठरला होता. वय वाढलेल्या खेळाडूंचा संघ अशी या संघावर टिकाही झाली होती. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रिटायरमेंन्टची वेळ आता आली आहे अशीही जोरदार चर्चा झाली होती. तर दुसरीकडे सलग विजय प्राप्त करणारा युवा खेळाडूंचा संघ अशी टॅगलाईन घेवून दिल्ली कॅपीटल्स पुढे आला होता. चॅम्पीअनशिपचा दावेदार म्हणून दिल्लीचा संघ फेव्हरीट असल्याचे मागच्या आयपीएलमध्ये अनेकांना वाटायला लागले होते. परंतु, एैनवेळी हा संघ अनुभवात कमी पडला आणि या संघाची पिछेहाट झाली. या दोन्ही संघाचा या सिझनचा हा पहिला सामना होता. अजुन या स्पर्धेत भरपुर सामने बाकी आहेत. परतु, गतीवर्षीची कामगिरी आणि आजच्या सामन्याचा निकाल बघता, मागच्या वर्षीची जे घडलं त्याची पुनराव़त्ती टाळता येईल का? याकडे दोन्ही संघ व्यवस्थापनाला लक्ष घालावे लागेल हे निश्चीत.
रविवार दि. ११ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
सनरायझर्स हैद्राबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई