कोलकाता – इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रापूर्वी अनेक परदेशी खेळाडू आपली नावे मागे घेत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खुलासा केला आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधील क्रिकेटपटूंपेक्षा भारतीय खेळाडू मानसिक आरोग्याच्या समस्येवर मात करण्यास अधिक सहनशील आहेत. या उलट परदेशी खेळाडूमध्ये ही क्षमता नसावी, असे गांगुली यांनी म्हटले आहे.
गांगुली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, खेळाडूंच्या बचावासाठी तयार केलेले सुरक्षित वातावरण ( बायो-बबल ) हे काही परदेशी खेळाडूकरिता आव्हानात्मक आहे. कोविड -१९ मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाल्यापासून खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहण्यास भाग पाडले गेले आहे, त्यामुळे त्यांचे जीवन हॉटेल्स आणि स्टेडियमपुरते मर्यादित झाले आहे. खेळाडू जैव-बबल बाहेरील कोणासही भेटू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना स्वत: ला फ्रेश ठेवणे अत्यंत अवघड बनते.
भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीनेही याबाबत म्हटले आहे की, या परिस्थितीमुळे खेळाडूंना मानसिक त्रास होत आहे. तर गांगुली म्हणाले की, आम्ही भारतीय खेळाडू परदेशी क्रिकेटपटूंपेक्षा जास्त सहनशील आहोत. मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजमधील बर्याच क्रिकेटपटूंबरोबर खेळलो असून ते लोक मानसिक आरोग्यावर लवकर हार मानतात.
बायो-बबलमध्ये गेल्या सहा-सात महिन्यांपासून क्रिकेट सराव सुरु आहे आणि हे खूप कठीण काम आहे. आता कोविड -१९ चा नेहमीच धोका असेल. त्यामुळे आपल्याला सकारात्मक असावे लागेल, स्वत: ला मानसिकदृष्ट्या तयार करावे लागेल. आपण सर्वांनी स्वतःला मानसिक प्रशिक्षण दिले पाहिजे.