नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा या वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सर्व खेळाडूंचे लसीकरण करण्याचा विचार करत होते. परंतु याबाबतची मागणी कोणत्याच खेळाडूने मंडळाकडे केली नाही. तसेच ऑलिम्पिक संघाचे लसीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. जपानच्या टोकियोमध्ये या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन होणार आहे.
लसीकरणाबाबत आम्ही अनौपचारिक चर्चा केली होती. परंतु आम्हाला लेखी स्वरूपात काहीच प्राप्त झाले नाही, असे बीसीसीआयच्या अधिकार्याने सांगितले. केंद्र सरकारच्या नियमांनुसार सध्या ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील लोकांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे आम्ही खेळाडूंचे लसीकरण करण्याची विनंती करणार आहोत, असेही अधिकारी म्हणाले. सरकारला सगळ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. सरकारची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याकडे मोठी योजना आहे. आम्हाला त्यांच्या अडचणी समजतात. भारतीय ऑलिम्पिक संघही सरकारच्या उत्तराची वाट पाहात आहे. क्रिकेटपटूंपेक्षा अॅथलिटना लसीकरणात प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे बीसीसीआयच्या चर्चेतून समोर आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सला झटका
दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अक्षर पटेलला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला दुसरा झटका बसला आहे. यापूर्वी त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अक्षर पटेल सध्या विलगीकरणात असून सगळ्या नियमांचे पालन करत आहे. कोलकाता नाईटरायडर्सचा फलंदाज नीतीश राणा याच्यानंतर अक्षर पटेल कोरोना संसर्ग होणारा दुसरा खेळाडून ठरला आहे. नीतीश राणाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. २२ मार्चला तो पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला लसीकरणाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.