मनाली देवरे, नाशिक
पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर संघाचा ३४ धावांनी पराभव करून प्लेऑफच्या शर्यतीतले आपले आव्हान जिवंत तर केले आहेच परंतु, गेल्या काही सामन्यात विजयीपथावर सुरु असलेल्या आरसीबीची घोडदौड थांबवून एक मोठा धक्का देखील दिला आहे.
आरसीबीने टॉस जिंकला आणि पंजाबला फलंदाजी दिली. आरसीबीला आपल्या संघाच्या फलंदाजीची क्षमता चांगली माहिती झालीय. त्यामुळे हा निर्णय सार्थ ठरला. पंजाब किंग्जची डावाची सुरुवात बघितल्यानंतर आज २०० च्या आसपास धावसंख्या जाते की काय, अशी शक्यता वाटायला लागली होती. खास करुन १० व्या षटकाअखेर ९८ धावा झाल्यानंतर तर पंजाब साठी हे लक्ष्य अवघड नव्हते. परंतु, पुढच्याच षटकात ख्रिस गेल (२४ चेंडूत ४६) बाद झाला आणि मग धावसंख्येला ब्रेक लागायला सुरुवात झाली. हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात २२ धावा निघाल्या नसत्या तर पंजाबची धावसंख्या आणखीनच वाईट दिसली असली. के.एल.राहूल हे आयपीएल मधले धावांचे मशिन आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो यंदा थोडा मागे होता परंतु या मॅचमध्ये ५७ धावात नाबाद ९१ धावा करुन त्याने पुन्हा एकदा नंबर वन स्थानावर झेप घेतली. आता त्याच्या नावावर ७ सामन्यात ३३१ अशी भरभक्कम धावसंख्या नोंदविली गेली आहे. हरप्रीत ब्रारने १७ चेंडून २५ धावांची एक छोटीशी पंरतु दमदार फलंदाजी करून पंजाब संघाला १७९ या एका चांगल्या आव्हानात्मक धावसंख्येवर नेवून ठेवले होते. आरसीबीच्या ताफयात मोहम्मद सिराज आणि यजुवेंद्र चहल सारखे गोलंदाज असतांना गेल्या काही सामन्यात मुख्य गोलंदाज ठरतोय तो मुळचा हरियाणाचा असलेला हर्शल पटेल. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो आजही नंबरवर स्थानावर आहे. परंतु या सामन्यात त्याचीच धुलाई झाली.
या सिझनमध्ये आरसीबीची दादागिरी चालूच रहाणार अशी शक्यता वाटत असतांना १० व्या षटकात सामन्याने एक वेगळे वळण घेतले. हरप्रीत ब्रारने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली आणि दुस–या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल हे क्लिन बोल्ड होवून मैदानावर परतले आणि या सिझनमधील आरसीबीच्या विजयी मोहीमेला ब्रेक लागला तो इथेच. हरप्रीत ब्रारचा हल्ला इथेच थांबला नाही. तो जेव्हा सामन्याच्या १२ षटकात पुन्हा गोलदाजीला आला तेव्हा त्याने एबी डिव्हीलीयर्सला देखील अवघ्या ३ धावांवर विकेटकिपर केएल राहूल करवी झेलबाद करुन आरसीबीच्या फलंदाजीला मोठे भगदाड पाडले. पुढे मग आरसीबीला या धक्यातून सावरायला वेळ मिळालाच नाही आणि हा सामना आरसीबीने मोठया फरकाने गमावला. तळाला जेमिसन आणि हर्शल पटेल यांनी फटकेबाजी केली खरी पंरतु, तोपर्यन्त सामना आरसीबीच्या हातातून सुटून गेलेला होता.
फंलदाजी करतांना १७ चेंडून २५ धावा, गोलंदाजी करतांना ४ षटकात अवघ्या १९ धावा देवून घेतलेले ३ मोठे बळी आणि क्षेञरक्षणात पटकावलेला १ झेल अशी अष्टपैलू कामगिरी हरप्रीतने करुन दाखविली.
शनिवार दि. १ मे २०२१ रोजी होणारा सामना –
मुंबई इंडीयन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज, अरुण जेटली स्टेडीअम, दिल्ली