अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्हीही तुमचा आयफोन अपडेट करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा! अॅपलने अलीकडेच iOS 15.4 अपडेट आणले आहे. या अपडेटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मास्क लावूनही फेस आयडीद्वारे फोन अनलॉक करू शकाल. याशिवाय काही नवीन फीचर्सही जोडण्यात आले आहेत. पण नवीन फीचर्समुळे अनेक यूजर्सना मोठ्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.
काही आयफोन वापरकर्त्यांनी, ज्यांनी आधीच अपडेट डाउनलोड केले आहे, त्यांनी या अपडेटमुळे बॅटरी लवकर संपत असल्याची तक्रार केली आहे. नवीन iOS अपडेटमुळे iPhones ची बॅटरी आधीपेक्षा वेगाने कमी होत आहे. iPhone 13 Pro, iPhone 13, iPhone 12, iPhone 11 आणि अगदी iPhone 7 सारख्या जुन्या मॉडेल्समध्ये ही समस्या दिसून येत आहे. अॅपल कंपनीने मात्र अद्याप या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही
याविषयी अनेक युझर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. त्यापैकी एका युझरने लिहिले आहे की, “आयफोन ios 15.4 वर अपडेट केल्यानंतर बॅटरी लवकर संपत आहे.” बॅटरी लाइफ व्यतिरिक्त, अपडेट डाउनलोड केल्यानंतर बर्याच युझर्सनी सिरी व्हॉईस फिचर नीट काम करत नसल्याचीही तक्रार केली आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहिले आहे, “कुणीतरी माझी मदत करा, नवीन अपडेटमुळे जेव्हा मी हे सिरी म्हणतोय तेव्हा सिरी उत्तर देत नाही आहे. असे का?”, अशा समस्या युझर्स शेअर करत आहेत.
नवीन अपडेटद्वारे आयफोनमध्ये युनिव्हर्सल कंट्रोल, फेस आयडी विथ मास्क, नवीन इमोजी आणि सिरीचा आवाज यांसारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. युनिव्हर्सल कंट्रोल्स वैशिष्ट्य तुम्हाला iPad आणि Mac दरम्यान फाइल्स ड्रॅग आणि ड्रॉप करू देते तसेच कीबोर्ड आणि माउस त्यांच्यामध्ये वायरलेस पद्धतीने शेअर करू देते. आता आयफोनमध्ये तुम्हाला मेल्टिंग फेस, सॅल्युटिंग फेस, जार, बीन्स, एक्स-रे, बबल्स असे इमोजी मिळतील.