मुंबई – बाजारात आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर दुकानदार लगेच त्या वस्तूची गुणवत्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. साधी सुटकेस जरी असली तरी त्यावर उभे राहून दाखवतो. तसेच सांगतो की, यावर हत्ती उभा राहिला तरी सुटकेस तुटणार नाही. परंतु घरी गेल्यावर लगेच सुटकेसचे लॉक तुटते. काही वेळा मोबाईल फोन बाबतीतही असेच दावे करण्यात येतात. या फोनवर चक्क गोरिला उभा राहिला तरी तुटणार नाही असे सांगितले जाते. परंतु तसे घडते का? कदाचित नाही. एखादी वस्तू अशी असते की, ती खरोखरच तुटत नाही, अगदी उंचावरून पडली तरीही. अॅपल कंपनीही त्यांच्या उत्पादनाबद्दल मोठे दावे करते. काही वैशिष्ट्यपूर्ण बाब असो किंवा गॅझेटची ताकद असो, अॅपलने प्रत्येक बाबतीत स्वतःला नंबर १ असेच वर्णन केले आहे, पण त्यात किती सत्यता आहे, हे चाचणीनंतरच समोर येते. याचा प्रत्यय नुकताच आला आहे.
एका पायलटच्या हातून त्याचा आयफोन एक्स हा मोबाईल सुमारे ११ हजार फूट उंचीवरून खाली पडला. पण या फोनला साधा स्क्रॅचही आला नाही. हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल पण हो खरे आहे. आयफोन एक्स हा इतक्या उंचीवरून पायलटच्या हातातून कसा पडला? असा प्रश्न सहाजिकच पडू शकतो. तर झाले असे की, डायमंड एव्हिएटर फोरमवर डेव्हिड नावाच्या वैमानिकाने लिहिलेल्या पोस्टनुसार, त्याचे विमान सुमारे ११ हजार २५० फूट उंचीवर उडत होते. यावेळी त्याने बाजूच्या खिडकीतून आयफोन एक्सद्वारे ढगांचा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेच्या उच्च दाबामुळे फोन हातातून निसटला आणि खाली कोसळला. त्यावेळी डेव्हिड हा कोलोरॅडो स्प्रिंग्जमधून अटलांटाला विमान घेऊन जात होता.
त्यानंतर पायलट डेव्हिडने फाइंड माय आयफोन याद्वारे आपला आयफोन एक्स शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला फोनचे स्थान ( लोकेशन) मिळाले. पण जेव्हा डेव्हिड फोनच्या लोकेशनवर पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. कारण सुमारे ११,२५० फूट उंचीवरून पडल्यानंतरही फोनवर साधा स्क्रॅचही आला नाही! फोनच्या मागील किंवा समोरच्या पॅनेलवर एकही स्क्रॅच नव्हता. फक्त फोनच्या कव्हरवर थोडी धूळ होती. पण फोन पूर्णपणे सुरक्षित होता. तसेच डेव्हिडच्या या फोनवर ओटरबॉक्स डिफेंडर मालिकेचे कव्हर होते जे त्याने २०१८ मध्ये खरेदी केले होते. दरम्यान, डेव्हिडने हे स्पष्ट केले नाही की फोन हा जमिनीवर, झाडावर, पाण्यात की कुठे पडला होता.