इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नी मध्ये प्रेमाचे नाते हेच संसार टिकून ठेवते, परंतु काही वेळा त्यांच्यामध्ये वादविवाद आणि ताणतणाव निर्माण होऊन एकमेकांना कोर्टात खेचण्याची भाषा देखील केले जाते, समाजात साधारणतः पती हा पत्नीला त्रास देतो, असा समज आहे. परंतु काही वेळा पत्नी देखील पती आणि तिच्या सासरच्या मंडळीला म्हणजेच पतीच्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करीत असल्याच्या घटना देखील अलीकडच्या काळात समाजात दिसून येत आहेत, या संदर्भात खुद्द न्यायालयाने देखील ताशेरे ओढले आहेत.
अतिशय कडक टिप्पणी
पती पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी कायद्याच्या काही कलमांचा गैरवापर केला जात असल्याची टिप्पणी ओरिसा उच्च न्यायालयाने केली आहे. पतीच्या कुटुंबाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी या कलमाच्या वापरात वाढ होत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान, ओरिसा उच्च न्यायालयाने आयपीसी कलम (498-A) याचा गैरवापराबाबत अतिशय कडक टिप्पणी केली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दाखल केलेला खटला रद्द ठरवला…
एखादी महिला सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे जर आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असेल, किंवा तिच्या जीवाला धोका असेल, तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर या कायद्यान्वये गुन्हा नोंद करता येतो. तसेच सासरच्या मंडळींनी एखाद्या महिलेकडून मालमत्तेची किंवा मौल्यवान वस्तूंची बेकायदेशीर मागणी करणे आणि मागणी पूर्ण न झाल्यास तिचा छळ करणे असा गुन्हा घडल्यास या कायद्यान्वये गुन्हा दाखल करता येतो. यात ओरिसा उच्च न्यायालयाने एका महिलेवर तिच्या भावाच्या पत्नीने दाखल केलेला खटला रद्द ठरवला.
न्यायमूर्ती जी. सतपथी यांनी ही कारवाई रद्द करत म्हटले की, आयपीसी कलम अंतर्गत अनेकदा पतीच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी सासूच्या विरोधात गैरवापर केला जातो. पतीच्या कुटुंबावर दबाव निर्माण करण्यासाठी या कायद्याचा दुरूपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. हुंड्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे सारसकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी या कलमाचा वापर केला जातो. या कलमाखाली नोंद झालेला गुन्हा हा अजामीनपात्र असतो.
IPC Section 498 Misuse High Court