मुंबई – मागील वर्षी कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले. मात्र या वर्षी 2021 मध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचे भविष्य बदलले आहे. अशीच एक कंपनी म्हणजे म्युझिक लेबल सारेगामा इंडिया होय.
शेअर बाजारात चढ -उतार झाल्याने सारेगामा इंडियाच्या गुंतवणूकदारांचे पैसेही वाढले आहेत. अवघ्या 9 महिन्यांत गुंतवणूकदारांनी प्रति शेअर 3500 रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. तर टक्केवारीनुसार, स्टॉक 420 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला सारेगामा इंडिया बीएसई निर्देशांकावर सुमारे 830 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करत होता. सध्या ते बीएसईवर 4,365 रुपयांच्या पातळीवर आहे. सारेगामाच्या शेअरची किंमत गेल्या पाच वर्षात जवळपास 18.5 पट वाढली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये शेअरची किंमत 238 रुपये होती, जी ऑक्टोबर 2021 मध्ये 4,460 रुपयांच्या पातळीवर गेली.
या आठवड्याच्या सुरुवातीला सारेगामा इंडियाने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानुसार कंपनीचा निव्वळ नफा 33.8 कोटी रुपयांवर गेला आहे. त्यात 16 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 29 कोटी होता. कंपनीच्या महसुलातही 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सारेगामा इंडिया ही भारतातील सर्वात जुनी संगीत कंपनी आहे. यात वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी आहेत, ती डिजिटल स्ट्रीमिंग, यूट्यूब, कारवां आणि टेलिव्हिजन सारख्या वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत