मुंबई – पीपीएफ योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीकडे आयकर व बचत गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. सदर योजना केंद्र सरकार चालवत असल्याने याकडे कमी जोखीम गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज देण्यात येत आहे. कोणतेही पीपीएफ खाते 15 वर्षात मॅच्युअर (परिपक्व) होते. पण नंतर ते पाच-पाच वर्षांनी वाढवता येऊ शकते. त्यामुळे पीपीएफ खाते निवृत्तीसाठी चांगली गुंतवणूक असून यामध्ये बराच काळ गुंतवणूक करत असेल तर ते फायदेशीर ठरते आणि करोडपती होता येते.
एका आर्थिक वर्षात गुंतवणूकदार पीपीएफमध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकतो. एका महिन्यात जास्तीत जास्त 12,500 रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. जर आपण 15 वर्षे सातत्याने 12,500 गुंतवणूक केली तर परिपक्वतेच्या वेळी 40,68,209 रुपये मिळतील. ज्यामध्ये तुमची गुंतवणूक 22.5 लाख रुपये असेल आणि व्याज 18,18,209 रुपये असेल. पुढील दहा वर्षे या योजनेत गुंतवणूक केल्यास आपण 25 वर्षांत पीपीएफच्या माध्यमातून लक्षाधीश होऊ शकता.
पीपीएफच्या नियमांनुसार, 15 वर्षानंतर 5-5 वर्षे करुन तुमची गुंतवणूक वाढवता येते. अशा परिस्थितीत 15 वर्षांनंतरही तुम्ही 12,500 ची गुंतवणूक करत राहिल्यास 20 वर्षांत पीपीएफ तुम्हाला, 66,58,288 लाख रुपये मिळतील. तसेच पुढील पाच वर्षांत ही बचत करोडो रुपये देऊ शकतो. त्यामुळे एका गुंतवणूकदारास दर महिन्याला 12,500 रुपये सलग 25 वर्षे गुंतवून 1,03,08,015 रुपये मिळतील. म्हणजेच जर आपण दररोज 416 रुपये वाचविले तर पीपीएफच्या माध्यमातून आपण 25 वर्षांत लक्षाधीश व्हाल.