नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाच्या शवविच्छेदनात गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर दुस-या दिवशी पोलिसांकडून कर्मचा-याची चौकशी करण्यात आली. तर या घटनेची दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने पोलिसांकडे सविस्त अहवालाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी सकाळी आश्रमाच्या आवारात लहानगा अलोक शिनगोरे हा मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदनात बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने आधारतीर्थ चर्चेत आले असून, या आश्रमाच्या कामकाजासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बालकाच्या मृत्यूनंतर राज्यातील काही पालकांनी आश्रमात धाव घेण्यास सुरूवात केली आहे. नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या या आश्रमात राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या निराधार मुलांचा सांभाळ केला जातो. या आश्रमात १८ वर्षापर्यंतची ७२ मुले तर २० हून अधिक मुली आहेत. आश्रमात बालकांच्या देखभालीसाठी कर्मचारी आहेत. या घटनेच्या दुस-या दिवशी बुधवारी पोलिसांकडून कर्मचारी आणि बालकांकडे चौकशी करण्यात आली.