मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टी-ट्वेंटी क्रिकेट हा खेळ तीन तासांचा असला तरी हल्ली नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ सामने सुरू असतात. याची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. षटकांची गती न राखल्याबद्दल संबंधित संघाला दंड तर असतोच परंतु मैदानावरही शिक्षा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-२० क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्याने क्षेत्ररक्षण करणार्या संघाला षटकांची गती न राखणे (स्लो ओव्हर रेट) महागात पडणार आहे. एवढेच नव्हे, तर संघाला क्षेत्ररक्षणात बदल करावे लागणार आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये षटकांची गती न राखल्याबद्दल आता कठोर शिक्षा देण्यात येणार आहे. निर्धारित वेळेच्या आत षटके पूर्ण न करणार्या संघाला ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवावा लागेल. हा नियम याच महिन्यात लागू होणार आहे. आयसीसीने संशोधित नियम आणि अटींअतर्गत द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावाच्या मध्ये पर्यायी शीतपेय ब्रेकची सुविधा असेल.
खेळाडू आणि सहाकरी स्टाफसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत षटकांच्या वेगमर्यादेसाठी आयसीसीच्या तरतुदी कायम राहतील. यामध्ये डिमेरिट अंक आणि संघ तसेच कर्णधाराच्या आर्थिक दंडाचा समावेश आहे.
साधारणतः पहिल्या सहा षटकांनंतर ३० यार्डाच्या बाहेर पाच क्षेत्ररक्षक ठेवले जाऊ शकतात. षटकांची गती राखली गेली नाही तर चारच क्षेत्ररक्षक ठेवता येणार आहे. गोलंदाजाच्या बाजूकडील पंचांना डावाच्या सुरुवातीच्या आधी निर्धारित वेळेत आणि कोणतीही बाधा आल्यास नव्याने निर्धारित वेळेची माहिती द्यावी लागणार आहे.
नव्या नियमांतर्गत पहिला सामना १६ जानेवारीला वेस्टइंडिज आणि आयर्लंडच्या दरम्यान सबिना पार्क येथे खेळवला जाणार आहे. तर महिलांचा पहिला सामना १८ जानेवारीला दक्षिण अफ्रिका आणि वेस्टइंडिजदरम्यान सेंच्युरियन पार्क येथे होणार आहे.